कराड नगरपरिषद शाळा क्र. ३ ची राज्यभर दणदणीत छाप; बीडीएस-ऑलिंपियाड मध्ये तब्बल ८४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

कराड : विद्या मोरे

कराड : गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वाधिक पटसंख्या यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पीएम श्री. कराड नगरपरिषद शाळा क्रमांक ३ ने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक ताकद सिद्ध केली आहे. देशपातळीवरील बीडीएस व ऑलिंपियाड परीक्षांमध्ये तब्बल ८४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेचा नावलौकिक अधिक उंचावला आहे. या भव्य यशाबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार नगरसेवक विजयसिंह यादव, मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

कार्यक्रमात बोलताना अर्जुन कोळी यांनी सांगितले की, लोकनियुक्त नगराध्यक्ष व शाळेचे आधारस्तंभ राजेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली २०११ ते २०२६ या कालावधीत शाळेच्या गुणवत्तेचा आलेख झपाट्याने उंचावला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे शासनाकडून नवीन शाळा इमारतीसाठी १० कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सुमारे २० कोटी रुपयांची मौल्यवान जमीन नगरपरिषदेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणवत्तापूर्ण व स्पर्धात्मक शिक्षण देण्यासाठी सर्व शिक्षक कटिबद्ध असून नगरसेवक विजयसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेला आणखी उच्च स्थानावर नेण्याचा आमचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इयत्ता १ ली ते ७ वी मधील ५२ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल पटकावले, तर ३२ विद्यार्थ्यांनी सिल्व्हर व ब्राँझ पदके मिळवून शाळेचा गौरव वाढवला. मुख्याध्यापक सुहास आलेकरी यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी पाटील व सुप्रिया खपले यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर जयश्री जाधव यांनी आभार मानले. शैलजा गुरव, ज्योती किर्तीकुडवे, श्याम ताकमोगे, मधुमालती बोबडे, अजित भोसले, अनिल नाईक यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार