कराड नगरपरिषदेाला थेट अल्टिमेटम; “अतिक्रमण हटवा नाहीतर ताळे ठोको!” — जनहिताय फाउंडेशनचा स्फोटक इशारा
शहरातील रस्ते, चौक आणि फुटपाथ अतिक्रमणांनी पूर्णपणे गुदमरले असताना कराड नगरपरिषद प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संताप व्यक्त करत जनहिताय फाउंडेशनने नगरपरिषदेविरुद्ध थेट रणशिंग फुंकले आहे.
संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब लांडगे यांनी मुख्याधिकारी व लोकनियुक्त नगराध्यक्षांना दिलेल्या तीव्र शब्दातील स्मरणपत्रात प्रशासनाच्या निष्क्रिय, ढिसाळ आणि उदासीन कारभाराचा समाचार घेत तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे.
दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या अर्जानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासन अतिक्रमणधारकांना जणू संरक्षण देत आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख मार्ग, बाजारपेठा आणि वर्दळीचे भाग हातगाडे, स्टॉल, खोकी, तात्पुरती दुकाने आणि दुचाकी पार्किंगने व्यापले असून पादचाऱ्यांना अक्षरशः रस्त्यावर जीव धोक्यात घालून चालावे लागत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी वाढून अपघातांचा धोका प्रचंड प्रमाणात वाढला आहे. अग्निशमन व रुग्णवाहिका यांसारख्या आपत्कालीन सेवांनाही मार्ग मिळत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी असताना नगरपरिषद पूर्णतः अपयशी ठरल्याचा थेट आरोप फाउंडेशनने केला आहे.
फाउंडेशनने प्रशासनाला अंतिम इशारा देत स्पष्ट शब्दांत म्हटले आहे —“३० दिवसांच्या आत शहरातील सर्व अतिक्रमणे हटवून फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे करण्यात आले नाहीत, तर दि. २४ एप्रिल २०२६ पासून कराड नगरपरिषद मुख्य प्रवेशद्वारासमोर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल.”
हे आंदोलन प्रतीकात्मक नसून निर्णायक लढा असेल, असा इशाराही देण्यात आला. गरज पडल्यास आंदोलन अधिक उग्र करण्याचा पर्याय खुला असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
या आंदोलनात बापुसाहेब लांडगे, मारुती बोभाटे आणि निवास माने आघाडीवर राहणार असून शहरातील नागरिक, व्यापारी व संघटनांनीही या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment