कोयना वसाहतीत भीषण अपघात! भाजी विक्रेत्या महिलेची रस्त्यावरच मृत्यू, तिघी जखमी — दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत संतापाची लाट!पर्यायी भाजी मंडई तातडीने द्या — शेतकरी संघटनेचा इशारा

 
कराड : विद्या मोरे

कराड तालुक्यातील कोयना वसाहत ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (दि. 23 मार्च 2026) घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण केले आहे. रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करत बसलेल्या एका गरीब महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन महिला गंभीर जखमी झाल्या. या अपघाताची प्राथमिक माहिती घेणाऱ्यांनी सांगितले की, निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा प्रसंग घडला.

मृत व जखमी महिला या अत्यंत गरीब कुटुंबातील असून भाजी विक्री करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट कोसळले असून उपासमारीची वेळ ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेतील आरोपी महिला व्यवसायाने डॉक्टर असूनही, जखमींना मदत न करता घटनास्थळावरून दुसरे वाहन बोलावून निघून गेल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही स्थानिकांनी प्रकरण दडपण्याचा आणि तडजोडीचा प्रयत्न केला, अशी माहिती देखील समोर आली आहे.

या घटनेनंतर शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल शंकरराव घराळ, नजीर पटेल (कराड तालुका कार्याध्यक्ष), विवेक कुराडे पाटील, संदीप काळे, सुरज जाधव, हुसेन पटेल, दादामिया पटेल व सलीम पटेल यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांना व जखमींना तात्काळ न्याय मिळावा यासाठी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

यासोबतच, रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करण्यास भाग पडल्यामुळे अशा दुर्दैवी अपघातांची शक्यता राहते. त्यामुळे भाजी विक्रेत्यांसाठी सुरक्षित व पर्यायी भाजी मंडईची जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे.

शेतकरी संघटना या घटनेत निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या आरोपीविरुद्ध कठोर कारवाई होईपर्यंत आवाज उठवत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून परिसरातील दुकानदारांकडील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करावी, अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार