मसूरमध्ये २५० विद्यार्थ्यांचा थरारक ग्राहक हक्क प्रबोधन कार्यक्रम; न्याय मिळवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर लायन्स क्लब मसूर आणि जागृत ग्राहक राजा संघटनेने दिले सखोल मार्गदर्शन!
कराड : विद्या मोरे
लायन्स क्लब ऑफ मसूर आणि जागृत ग्राहक राजा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कै दादासाहेब चव्हाण विद्या संकुल, माळवाडी, मसूर येथे या महिन्याचे ग्राहक प्रबोधन उपक्रम यशस्वीरित्या पार पडले. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक हक्कांचे संरक्षण, वस्तू किंवा सेवा घेतल्यानंतर होणारी फसवणूक, आणि न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करणे होते. या कार्यक्रमाला सुमारे २५० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
विद्या संकुलाचे प्रमुख व जागृत ग्राहक राजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विक्रम शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत ग्राहक संघटनेच्या यशस्वी अनुभवातून प्रेरणा दिली आणि न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्याचे मार्ग विद्यार्थ्यांना समजावले.
लायन्स क्लब ऑफ मसूरचे अध्यक्ष डॉ. रमेश लोखंडे यांनी क्लबच्या कार्याची महती, समाजातील योगदान आणि ग्राहक हक्क रक्षणामधील उपयुक्तता स्पष्ट केली. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की ग्राहक हक्कांची माहिती असणे आणि त्यासाठी सजग राहणे हे सामाजिक जबाबदारीचे महत्त्वाचे अंग आहे.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक वक्ते जागृत ग्राहक राजा संघटना, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ग्राहकांचे हक्क, अडचणी आणि न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी स्लाईडसह माहिती देत विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी उपलब्ध कायदेशीर उपाय, सरकारी यंत्रणा आणि तक्रारी नोंदविण्याची पद्धत स्पष्ट केली. तसेच, ग्राहक संघटना व लायन्स क्लब यांचा एकत्रित उपक्रम समाजासाठी किती उपयुक्त ठरतो हे विद्यार्थ्यांना समजावले.
कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख व्यक्ती: डॉ. रमेश लोखंडे, डॉ. विक्रम शिंदे, जितेंद्र निकम, डॉ. अशोक कांबळे, दिलीप पाटील. आभार मानले अमृता नांगरे यांनी. तसेच विद्या संकुलातील संगिता शेलार, प्रा. प्रतीक जाधव, प्रणाली यादव आणि इतर स्टाफ सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment