विद्यार्थी ज्ञानासोबत कौशल्य आत्मसात करावे; समाजहित आणि वैयक्तिक यशासाठी आवाहन – डॉ. व्ही एन शिंदे

 
कराड : विद्या मोरे
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, वर्ये, सातारा येथे आज वार्षिक बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही एन शिंदे होते.

डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, व्यावसायिक पदवीधारकांनी केवळ शैक्षणिक ज्ञानावर भर न देता कौशल्य आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, वाचनामुळे फक्त माहिती मिळत नाही, तर ती माहिती विचारमंथन व अनुभवाच्या आधारावर आत्मसात केल्यास ती भविष्यातील जीवनासाठी उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांनी आई-वडील व शिक्षकांचे मार्गदर्शन लक्षात ठेवावे आणि आपल्या कृतीतून यश मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बी. एस. सावंत यांनी सांगितले की, आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेकदा असत्य सत्य वाटते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची चौकस बुद्धी वापरून सत्य पडताळावे, न्याय व सत्याचे पालन करावे. वैयक्तिक विकासासोबतच सामाजिक बांधिलकी जपून समाजातील गरजू लोकांसाठी उपयोगी ठरावे. विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेचे ब्रँड अँबेसिडर म्हणून कर्मवीरांच्या शिकवणीनुसार मन, मेंदू आणि मनगट बळकट करून जीवनात सुजाण नागरिक व समाजहितचिंतक होण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमात शैक्षणिक, क्रिडा, संशोधन व सांस्कृतिक क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच संशोधन, पुस्तकलेखन व लेख प्रकाशनात यश मिळविलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठ व राज्य स्तरावर उल्लेखनीय यश मिळविलेल्या आविष्कार संशोधन स्पर्धेतील विद्यार्थी व शिक्षकांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ प्रियांका लोखंडे आणि सौ प्रीती श्री यांनी केले. प्रस्तावना प्राध्यापक डॉ. एस. एस. भोला यांनी सादर केली. वार्षिक अहवालाचे वाचन डॉ. एस. आर. निकम यांनी केले, तर विद्यार्थ्यांच्या वतीने आभार विराज तावस्कर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन शारीरिक शिक्षक संचालक डॉ. अक्रम मुजावर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार