४७ वर्षांच्या अखंड सामाजिक सेवेचा राष्ट्रीय गौरव; अनिल मंद्रूपकर ‘अटल राष्ट्र सेवा पुरस्कार’ ने सन्मानित
कराड : विद्या मोरे
सामाजिक कार्याच्या क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ सातत्याने कार्य करत समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या लायन अनिल मंद्रूपकर यांना ‘अटल राष्ट्र सेवा पुरस्कार’ प्रदान करून राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५० मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रकवी दिवंगत रामधारी सिंह ‘दिनकर’ स्मृती न्यास, नवी दिल्ली यांच्या वतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू करण्यात आला असून, सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान दिला जातो.
मूळचे सोलापूरचे असलेले अनिल मंद्रूपकर यांनी १९७९ साली गुजरातमधील मोरबी पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करून सामाजिक कार्याची सुरुवात केली. त्यानंतर युवक बिरादरी, लायन्स इंटरनॅशनल, वनराई, एनएससीसी, अलर्ट, व्हाया इंटरनॅशनल, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन, कमिन्स इंडिया फाउंडेशन, विश्वेश्वर एम्पॉवरमेंट ऑर्गनायझेशन, आशीर्वाद वृद्धाश्रम, स्नेहक्षितिज मानसिक पुनर्वसन केंद्र, एकलव्य, लेक टाऊन सोसायटी आदी विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवले.
कमिन्स इंडियामध्ये ४० वर्षे कार्यरत असतानाही त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक उपक्रम हाती घेतले. २००६ साली पुण्यात पर्यावरण विषयक लायन्स क्लबची स्थापना करून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि 3R (Reduce, Reuse, Recycle) तत्त्वांवर आधारित मोहिमा राबवण्यात आल्या. ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत अनेक गावांमध्ये शौचालय उभारणीसह स्वच्छता उपक्रम प्रभावीपणे राबवले गेले. २००८ साली आर्वी गावातील शौचालय प्रकल्पाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, ही त्यांच्या कार्याची मोठी पावती मानली जाते.
याशिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, आर्थिक मदत तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्यही त्यांनी सातत्याने केले आहे. अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला त्यांनी हातभार लावला असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांचे आयुष्य घडले आहे.
पुरस्कार स्वीकारताना अनिल मंद्रूपकर यांनी सर्व सहकारी संस्था, मित्रपरिवार आणि समर्थकांचे आभार मानले. “विकसित भारताच्या उभारणीसाठी सामाजिक कार्य अखंड सुरू ठेवणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सोलापूरसह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळत आहे.
Comments
Post a Comment