संघटन बळकटीसाठी काँग्रेस मैदानात; साताऱ्यातून अभियानाची सुरुवात, कराडमध्ये आमदार नरेंद्र राजन यांच्या उपस्थितीत हालचालींना वेग
कराड, दि. ११ एप्रिल : विद्या मोरे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ची सुरुवात सातारा जिल्ह्यातून करण्यात आली असून, या अभियानामुळे जिल्ह्यासह राज्यात काँग्रेसच्या संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशचे आमदार नरेंद्र राजन यांनी कराड येथे ब्लॉकनिहाय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. बैठकीत कार्यकर्त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि संघटनात्मक कमकुवतपणा जाणून घेत पुढील दिशा ठरविण्यावर भर देण्यात आला.
बैठकीनंतर आमदार राजन यांनी पत्रकार परिषद घेऊन अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पक्षाची संघटनात्मक ताकद तळागाळापर्यंत वाढविणे हा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवर :
जिल्हा निरीक्षक संजय बालगुडे, कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव पाटील, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष अमित जाधव, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र शेलार, अजितराव पाटील, प्रदीप जाधव, गजानन आवळकर, सयाजी पाटील आदी.
महाराष्ट्र काँग्रेस पक्ष सध्या संघटनात्मक फेरबदलाच्या तयारीत असून, या अभियानांतर्गत राज्यातील ७२ जिल्हाध्यक्षांची यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे. तसेच ६७५ तालुक्यांमध्ये तालुका स्तरावर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा आणि काही मोजक्या नेत्यांचे वर्चस्व याबाबत कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तळागाळापर्यंत संघटन मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी बोलताना आमदार नरेंद्र राजन म्हणाले की, सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष अधिक सक्षम करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सर्वसामान्य जनता, महिला व शेतकरी यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस सातत्याने लढा देत असून, भाजपला प्रभावीपणे विरोध करण्यासाठी संघटना मजबूत करणे आवश्यक आहे.
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक संजय बालगुडे यांनी सांगितले की, राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष हे वर्ष ‘संघटन बांधणीचे वर्ष’ म्हणून साजरे करत आहे.
पक्षाची ताकद केवळ नेतृत्वापुरती मर्यादित न राहता ती बूथ स्तरापर्यंत दिसली पाहिजे, यासाठी ब्लॉक ते जिल्हास्तरावर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे ‘संघटन सृजन अभियान’ जिल्ह्यात तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, तळागाळातील कार्यकर्त्यांना प्राधान्य देत पक्ष अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
Comments
Post a Comment