कराडमध्ये पंपिंग स्टेशन व पाणीपुरवठा प्रकल्पांचे भूमिपूजन; मलनिस्सारण व जलव्यवस्थेला नवी दिशा
कराड : विद्या मोरे कराड नगरपरिषद हद्दीत शहराच्या मूलभूत सुविधांना बळकटी देणाऱ्या पंपिंग स्टेशन क्रमांक २ व ४ तसेच नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन या महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन गुरुवार, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी विविध ठिकाणी संपन्न होणार आहे. या कामांमुळे शहरातील मलनिस्सारण व पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पांना मा. ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गती मिळाली आहे. तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. राजेंद्रसिंह यादव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ही कामे प्रत्यक्षात मार्गी लागली आहेत.
शहरातील मलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पंपिंग स्टेशन क्रमांक २ व ४ या कामांचे भूमिपूजन सकाळी १० वाजता अनुक्रमे वैकुंठधाम स्मशानभूमी परिसर व नाना-नानी पार्क परिसर येथे पार पडणार आहे. त्यानंतर कराड नगरपरिषद वाढीव भागातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या सोयीसाठी नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन सकाळी ११.३० वाजता श्रीराम चौक, सूर्यवंशी मळा रोड (स्टेडियम पाठीमागे) येथे होणार आहे.
या सर्व प्रकल्पांमुळे शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम, नियमित व सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आवश्यक असलेली पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन शहराच्या नियोजित विकासाला चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे, अनेक भागांमध्ये भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवरही या कामांमुळे प्रभावी तोडगा निघण्याची शक्यता आहे.
सदर भूमिपूजन समारंभ माजी सहकार व पणन मंत्री मा. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते तर नगराध्यक्ष मा. राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. यावेळी कराड नगरपरिषदेचे सर्व सभापती, नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी तसेच इतर मान्यवर लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कराड शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून, नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन कराड नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment