स्वतः भिजत राहिले, पण शहराला सावरत राहिले… कर्तव्यनिष्ठ गोसावी साहेबांचा कृतज्ञतेने गौरवपूर्ण सत्कार
कराड : विद्या मोरे काल कराड शहरात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. विशेषतः कृष्णा कॅनॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आणि रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर काही नागरिक सुरक्षिततेसाठी आसरा शोधताना दिसत होते.
अशा कठीण आणि धोकादायक परिस्थितीतही मा. गोसावी साहेबांनी आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा जपत भर पावसात तासन्तास उभे राहून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अथक प्रयत्न केले. पावसाच्या मुसळधार सरी, थंडी आणि वार्याची पर्वा न करता त्यांनी वाहतुकीचे नियोजन करत नागरिकांना दिलासा दिला. त्यांच्या तत्परतेमुळे मोठ्या प्रमाणात होणारी अडचण कमी झाली आणि अनेकांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करता आले.
गोसावी साहेबांच्या या कर्तव्यदक्ष आणि निःस्वार्थ सेवेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये कृतज्ञतेची भावना व्यक्त होत असून, “अशा अधिकाऱ्यांमुळेच समाजात सुरक्षिततेची भावना टिकून आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत. संकटाच्या काळात स्वतःचा विचार न करता नागरिकांच्या सेवेसाठी झटणारे अधिकारी हे खरोखरच समाजासाठी प्रेरणादायी ठरतात, हे त्यांच्या कार्यातून अधोरेखित झाले.
दरम्यान, त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गणेश पवार आणि समीर पाटवेगार यांच्या हस्ते मा. गोसावी साहेबांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हा छोटासा पण मनापासून केलेला गौरव सोहळा पार पडला.
यावेळी वाहतूक शाखेचे ए.पी.आय. मा. सूर्यवंशी साहेब, मा. मर्ढेकर दादा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी गोसावी साहेबांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
अशा कर्तव्यनिष्ठ आणि समर्पित अधिकाऱ्यांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी असून, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक नागरिकाने वाहतुकीचे नियम पाळणे, प्रशासनाला सहकार्य करणे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
Comments
Post a Comment