मायेचा ओलावा आणि सेवाभावाची उब; इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमचा संजीवन वृद्धाश्रमात हृदयस्पर्शी उपक्रम

 

कराड : विद्या मोरे : समाजसेवेची जपलेली परंपरा आणि माणुसकीचा जिव्हाळा याचा सुंदर प्रत्यय इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम यांच्या सेवाभावी उपक्रमातून पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. कार्वे नाका, कराड येथील संजीवन वृद्धाश्रमात “धान्य बँक” या परमनंट प्रोजेक्ट अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीची भावना व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमाअंतर्गत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना धान्य, कडधान्य, किराणा साहित्य तसेच स्वच्छतेसाठी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मात्र हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित न राहता, वृद्धांच्या आयुष्यात आनंदाचे आणि आपुलकीचे काही क्षण देणारा ठरला. क्लबच्या सदस्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या भावना, अडचणी आणि जीवनातील अनुभव जाणून घेतले. अनेक वृद्धांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करताना डोळे पाणावले, तर सदस्यांनीही त्यांना मानसिक आधार देत मायेचा हात दिला.

आजच्या वेगवान आणि धावपळीच्या जीवनात वृद्धांना वेळ देणारे हात कमी होत चालले आहेत. अशा परिस्थितीत इनरव्हील क्लबने राबविलेला हा उपक्रम समाजाला संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरला. “वृद्धांची सेवा हीच खरी समाजसेवा” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम हे वर्षभर विविध सामाजिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक आणि सेवाभावी उपक्रम राबवत असून, समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचे कार्य सातत्याने करत आहे. त्याच सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.संजीवन वृद्धाश्रम हे घोरपडे कुटुंबीय अत्यंत समर्पण भावनेने आणि स्वखर्चाने चालवत असून, निराधार वृद्धांची सेवा हेच आपले कर्तव्य मानून ते अविरत कार्यरत आहेत. त्यांच्या या निःस्वार्थ सेवाभावाबद्दल क्लब सदस्यांनी विशेष कौतुक व्यक्त केले.

या प्रसंगी क्लब अध्यक्षा सारिका शहा, सेक्रेटरी निमिषा गोर, चार्टर प्रेसिडेंट छाया पवार, विद्या पावसकर, वृषाली पाटणकर, सुषमा तिवारी, अंजना माने, स्मिता शहा, तरुणा मोहिरे, मनीषा पाटील, विद्या शहा, रतन शिंदे, नंदा आवळकर, शिवांजली पाटील, सपना लुनिया, सुकेशनी कांबळे, हेमलता फुटाणे, अनिता शुक्ला, प्रिया बोंगाळे, रजनी बोंगाळे, दिपाली लोहार, सारिका कदम, रुपाली तपासे, चांदणी लाडानी, राजश्री शहा, विजयश्री मोहिते आणि अपूर्वा पाटणकर यांनी उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार