मिनी ऑलिम्पिकमध्ये तायक्वांदोतील चमकदार कामगिरी; स्वरूपा सोरटेचा गौरव
मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत तायक्वांदो खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ब्लॅक बेल्ट प्राप्त केलेल्या कु. स्वरूपा सोरटे हिचा समता सामाजिक विकास संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून तिचा गौरवचिन्ह देऊन सत्कार सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. वसंत हंकारे यांच्या हस्ते करण्यात आला.
कु. स्वरूपा सोरटे हिने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत एपी स्पोर्ट अकॅडमीचे प्रतिनिधित्व करत तायक्वांदो खेळात दमदार सहभाग नोंदवला. तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे तिने ब्लॅक बेल्ट मिळवत आपल्या अकॅडमीसह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
स्वरूपाला प्रशिक्षक श्री. अमोल पालेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. एपी स्पोर्ट अकॅडमीमार्फत तिने केलेली मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि क्रीडाप्रती असलेली निष्ठा यामुळे ती आज अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
समता सामाजिक विकास संस्थेच्या कार्यक्रमामध्ये स्वरूपाच्या यशाचे कौतुक करत तिच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते राष्ट्रीय स्तरावरही चमकू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.
स्वरूपा सोरटे हिच्या या यशामुळे एपी स्पोर्ट अकॅडमीमध्ये आनंदाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment