नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या प्रयत्नांना मोठे यश : लोकशाही अण्णाभाऊ साठे योजनेतून कराड शहरासाठी २.१६ कोटींचा भरीव निधी मंजूर
कराड, विद्या मोरे — जिल्हा नियोजन समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या लोकशाही अण्णाभाऊ साठे योजना २०२५-२६ अंतर्गत कराड शहरातील विविध विकासकामांना मोठी मंजुरी मिळाली आहे. या योजनेतून एकूण रु. २,१६,६२,२५२/- इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असून, त्यामुळे शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे.
या विकासकामांना मा. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुरी मिळाली असून, लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विशेष प्रयत्नांमुळे हा निधी कराड शहरासाठी उपलब्ध झाला आहे.
या निधीतून शहरातील विविध भागांमध्ये रस्ते दुरुस्ती व नव्या रस्त्यांचे बांधकाम, पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणे, स्वच्छता सुविधांमध्ये सुधारणा करणे तसेच सामाजिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसंबंधित कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणार असून नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि दर्जेदार सेवा मिळणार आहे.
या विकासकामांमुळे कराड शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात सकारात्मक बदल होणार असून, शहराच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणामुळे भविष्यातील विकास प्रकल्पांसाठीही शहर अधिक सक्षम होणार आहे.
या मंजुरीबद्दल मा. पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे सर्व स्तरांतून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान, कराड शहर अधिक आधुनिक, सक्षम आणि सुविधायुक्त करण्यासाठी भविष्यातही अशाच विविध विकास योजनांद्वारे कामे राबविण्याचा निर्धार नगरपरिषदेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment