कोयना बँकेची दमदार वाटचाल; २०० कोटी ठेवींचा टप्पा पार‘अ’ ऑडिट वर्गाची परंपरा कायम; पारदर्शक कारभारामुळे विश्वास अधिक बळकट
सन १९९६ मध्ये कराड येथे स्थापन झालेल्या या बँकेने सातारा, सांगली आणि पुणे या तीन जिल्ह्यांमध्ये आपले जाळे विस्तारले आहे. सध्या बँकेच्या एकूण १२ शाखा कार्यरत असून, मुख्य कार्यालय स्वमालकीच्या सुसज्ज इमारतीत कार्यरत आहे. स्थापनेपासून सातत्याने नफ्यात राहण्याची परंपरा जपत बँकेने दरवर्षी ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त केला आहे, जे बँकेच्या पारदर्शक आणि शिस्तबद्ध कारभाराचे द्योतक आहे.
मार्च २०२६ अखेर बँकेच्या ठेवी २०१.३५ कोटी रुपये इतक्या झाल्या असून, १४१.१० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेचा सीडी रेशो ७०.०७ टक्के इतका समाधानकारक आहे. शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्थापनामुळे बँकेने १.९५ कोटी रुपयांचा ढोबळ नफा आणि ०.९२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. तसेच, बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) १५.१२ टक्के असून, निव्वळ एनपीए २.७७ टक्के इतका मर्यादित राखण्यात बँकेला यश आले आहे.
ग्राहकांना जलद आणि आधुनिक सेवा देण्यासाठी बँकेने IMPS (मोबाईल बँकिंग) व UPI यांसारख्या सुविधांचा यशस्वी अवलंब केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांची पूर्तता करत असताना, संचालक मंडळाने निस्वार्थपणे व विश्वस्ताच्या भूमिकेतून काम केल्यामुळेच ही प्रगती साध्य झाली, असे उपाध्यक्ष साहेबराव शेवाळे यांनी नमूद केले.
बँकेच्या या यशाबद्दल बोलताना अध्यक्ष कृष्णत पाटील म्हणाले की, स्व. विलासकाका पाटील यांच्या विचारांचा वारसा आणि ॲड. उदयसिंह पाटील यांचे मार्गदर्शन यामुळे बँक सातत्याने प्रगतीपथावर आहे. ग्राहकांना तत्पर सेवा देणे हेच आमचे ध्येय असून, अधिकाधिक सभासद व खातेदारांनी बँकेच्या आकर्षक ठेव व कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
Comments
Post a Comment