स्मृतिदिनानिमित्त दिगंबर काशिनाथ पालकर सांस्कृतिक प्रतिष्ठान यांचा दिमाखदार सत्कार सोहळा; समाजाभिमुख कार्यकर्त्यांचा गौरव
कराड: विद्या मोरे : दिगंबर काशिनाथ पालकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कराड यांच्या वतीने स्वर्गीय दिगंबर काशिनाथ पालकर (बापू) यांच्या 21व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष सत्कार समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आदर्श निर्माण केला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कृष्णा विश्वविद्यालय, कराडचे कुलपती मा. डॉ. सुरेश जयवंतराव भोसले (बाबा) होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपाध्यक्ष, कृष्णा खोरे विकास महामंडळ मा आनंदराव पाटील (नाना) तसेच ग्रामीण साहित्य, पुणे येथील मा. ब. ल. पोतदार यांची मान्यवर उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. प्रास्ताविकात शशांक पालकर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा व उद्दिष्टांचा आढावा घेत स्मृतिदिनाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचा परिचय जयंतराव पालकर यांनी, आनंदराव पाटील यांचा परिचय शशांक पालकर यांनी, तर ब. ल. पोतदार यांचा परिचय सौ. वैशाली पालकर यांनी करून दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ नारायण पालकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षाराणी पवार यांनी सादर केले.
या प्रसंगी समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘समाजभूषण’, ‘समाजरत्न’, ‘चित्र महर्षी’ आणि ‘वृक्षमित्र’ अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, संस्कृती, पर्यावरण आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अशा उपक्रमांची समाजाला अत्यंत गरज असल्याचे सांगत, अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा सत्कार आनंदराव पालकर यांच्या हस्ते करण्यात आला. समारोप प्रसंगी अमोल पालकर यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे विशेष उल्लेख केले.
कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. एकंदरीत हा सत्कार सोहळा समाजातील सकारात्मक कार्याला प्रेरणा देणारा ठरला.
Comments
Post a Comment