कऱ्हाडात श्री नृसिंह जन्मोत्सवाचा भक्तिमय सोहळादिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; कीर्तन, मंत्रजागर व जन्मकाळ सोहळ्याने भक्तिरसाचा जागर

कराड विद्या मोरे 
कऱ्हाड शहरातील मंगळवार पेठ परिसरातील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी श्री नृसिंह जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात सध्या उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून जन्मोत्सवानिमित्त दिवसभर मंत्रोच्चार, अभिषेक, भजन, कीर्तन आणि जन्मकाळ सोहळ्याने भाविकांना भक्तिरसाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.

पहाटेपासूनच धार्मिक विधींना प्रारंभ होणार असून सकाळी ६.३० ते ७.०० या वेळेत पवमानसूक्त तसेच पंचसूक्त अभिषेक संपन्न होणार आहे. नारायण सूक्त, विष्णू सूक्त, पुरुष सूक्त, श्री सूक्त व आमभृणी सूक्त यांच्या मंगलमय उच्चारात वेदशास्त्र संपन्न वरद वामन कुलकर्णी गुरुजी आणि मल्हारी उमराणी गुरुजी यांच्या उपस्थितीत अभिषेक विधी पार पडणार आहे.

यानंतर सकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत विष्णुसहस्रनाम पठण, सकाळी ८.३० ते ९.०० या वेळेत वेदशास्त्र पाठशाळेच्या वतीने मंत्रजागर तसेच सकाळी ९.३० ते १०.०० या वेळेत श्री नृसिंह बीज मंत्र जागर आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर दिवसभर वेदमंत्रांच्या निनादाने भारावून जाणार आहे.

सायंकाळच्या सत्रात भक्तीचा रंग अधिक खुलणार असून सायंकाळी ४.०० ते ५.०० या वेळेत शारदा भजनी मंडळ, कऱ्हाड यांचा भजन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत सुप्रसिद्ध ह.भ.प. श्री पित्रे गुरुजी, कासेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) यांचे सुमधुर कीर्तन होणार असून श्री ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ, कऱ्हाड यांची त्यांना संगीत साथ लाभणार आहे.

सायंकाळी ७.०० ते ७.३० या वेळेत श्री नृसिंह जन्मकाळ सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. त्यानंतर रात्री ८.०० ते ८.३० या वेळेत हळदीकुंकू व तीर्थप्रसाद कार्यक्रम पार पडणार असून रात्री ९.०० ते ९.३० या वेळेत विष्णुसहस्रनाम मंत्रजागराने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

ज्या भाविकांना श्रीस अभिषेक करावयाचा आहे त्यांनी बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हा धार्मिक सोहळा श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निकजवळ, संत सखु मंदिरासमोर, मंगळवार पेठ, कऱ्हाड येथे आयोजित करण्यात आला असून ॲड. विराग अरुण जांभळे यांच्या वतीने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२२६०३३९१ / ८६६८६७००९.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार