मतदार यादीत गोंधळाचा स्फोट! कराड दक्षिण काँग्रेसचा इशारा; पारदर्शकता नसेल तर तीव्र आंदोलन छेडणार
कराड, विद्या मोरे : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदान सखोल पुनःनिरीक्षण (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदार यादीतील अनियमिततेचा गंभीर मुद्दा समोर आला असून, काँग्रेस पक्षाने यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार सौ. कल्पना ढवळे यांना निवेदन देत मतदार यादीतील दुबार, बोगस तसेच मतदारसंघाबाहेरील अनिवासी मतदारांची नावे तात्काळ वगळण्याची आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याची ठाम मागणी करण्यात आली.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, कराड दक्षिण मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दुबार व संशयास्पद नावे आढळत असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
मुख्य मागण्या :
• मतदार यादीतील सर्व दुबार नावे तात्काळ शोधून काढून वगळण्यात यावीत.
• बोगस (खोट्या) नोंदींची स्वतंत्र चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी.
• मतदारसंघाबाहेरील अनिवासी मतदारांची नावे ओळखून ती हटवावीत.
• संपूर्ण पुनःनिरीक्षण प्रक्रियेचा तपशील, निकष व कार्यपद्धती सार्वजनिक करावी.
• प्रत्येक टप्प्यावरची प्रगती अहवाल स्वरूपात जाहीर करावी.
• सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिक पत्रकार यांना सहभागी करून संयुक्त देखरेख समिती स्थापन करावी.
• नागरिकांना हरकती व आक्षेप नोंदवण्यासाठी सुलभ व पारदर्शक यंत्रणा उपलब्ध करून द्यावी.
• निवडणूक अधिकाऱ्यांनी ठराविक वेळापत्रक जाहीर करून त्यानुसार कारवाई पूर्ण करावी.
तसेच, संपूर्ण मतदान पुनःनिरीक्षण प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व स्तरांवर काटेकोर देखरेख ठेवण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर मतदार यादी पुनःनिरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकता राखली नाही आणि बोगस मतदारांची नावे वगळण्यास टाळाटाळ केली, तर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी नामदेवराव पाटील (अध्यक्ष, कराड दक्षिण काँग्रेस कमिटी), इंद्रजीत चव्हाण (युवा नेते), भानुदास माळी (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस), संग्राम पवार (पंचायत समिती सदस्य), रवींद्र बडेकर, दिग्विजय सूर्यवंशी (सोशल मीडिया अध्यक्ष, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी), प्रदीप जाधव (सेक्रेटरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), अशोकराव पाटील (माजी नगरसेवक), वैशाली जाधव (अध्यक्षा, कराड दक्षिण महिला काँग्रेस), संजय तडाखे (अध्यक्ष, सातारा जिल्हा काँग्रेस एससी-एसटी विभाग), तसेच दीपक पाटील, मुकेश मोहिते, अक्षय सुर्वे, देवदास माने, शरद पाटील, अवधूत पाटील, आबा सूर्यवंशी, असिफ नदाफ, दिग्विजय जमाले, निवास जाधव, समीर इनामदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment