शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि संशोधनाधिष्ठित निर्णयप्रक्रिया आवश्यक - प्रा. डॉ. पराग कालकर

 कराड : विद्या मोरे

सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च (केबीपी आयएमएसआर), वर्ये, सातारा येथे आयोजित करण्यात आलेली “अलाइव्ह 2026” ही चौथी राष्ट्रीय परिषद उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली. “सस्टेनेबल डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज” या विषयावर आधारित परिषदेत देशभरातील संशोधक, प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. परिषदेमध्ये एकूण ३२ संशोधकांनी आपले संशोधन निबंध सादर केले.

परिषदेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग कालकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. स्वेता मेहता या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ. बी. एस. सावंत होते. उद्घाटनप्रसंगी “एथॉस रिसर्च जर्नल” तसेच “अलाइव्ह कॉन्फरन्स शोधनिबंध प्रोसीडिंग” यांचे प्रकाशन करण्यात आले.

आपल्या बीजभाषणात प्रा. डॉ. पराग कालकर यांनी शाश्वत विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नवोन्मेषी विचारसरणी आणि संशोधनाधिष्ठित निर्णयप्रक्रिया यांचे महत्त्व अधोरेखित केले. पर्यावरण संवर्धन, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि समाजाभिमुख विकासासाठी संशोधनकेंद्री दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सन्माननीय अतिथी डॉ. स्वेता मेहता यांनी ग्रीन मॅनेजमेंट, डिजिटल इनोव्हेशन आणि उद्योग-शैक्षणिक समन्वय यावर मार्गदर्शन करताना शाश्वत विकासासाठी शिक्षणसंस्था व उद्योग क्षेत्रातील सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. बी. एस. सावंत यांनी शाश्वत विकास म्हणजे आर्थिक वाढीसोबत नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण, सामाजिक मूल्यांचे जतन आणि मानवकेंद्रित विकास यांचा समतोल असल्याचे स्पष्ट केले. वाढते शहरीकरण, वाहतूक व्यवस्थेतील समस्या, प्रदूषण आणि राहणीमान निर्देशांकातील घसरण या गंभीर मुद्यांवर समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या तांत्रिक सत्रात श्री. शिरीष खुटाळे यांनी “शाश्वत विकास धोरणांची उद्योग क्षेत्रातील अंमलबजावणी – केस स्टडी” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. दुसरे तांत्रिक सत्र डॉ. एन. आर. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या सत्रात डॉ. पी. एम. कुलकर्णी (बेळगाव) यांनी “शाश्वत विकास धोरणांमधील संशोधन पद्धती” या विषयावर मार्गदर्शन केले.

दुपारनंतर विविध ट्रॅकमध्ये संशोधन निबंधांचे सादरीकरण करण्यात आले. परिषदेत सहभागी झालेल्या संशोधकांनी शाश्वत विकास, व्यवस्थापन, पर्यावरण, डिजिटल तंत्रज्ञान आणि सामाजिक परिवर्तन यांसारख्या विविध विषयांवर आपले संशोधनपर विचार मांडले.

परिषदेचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. गुरुनाथ जे. फगरे, प्राचार्य किसनवीर महाविद्यालय, वाई हे होते, तर अध्यक्षस्थानी डॉ. बी. एस. सावंत होते. यावेळी उत्कृष्ट संशोधन सादरीकरणांचे विशेष कौतुक करण्यात आले.

परिषदेचे संयोजक डॉ. एस. एस. भोला व सहसंयोजक श्रीमती टी. एन. शेवते यांनी परिषदेचे नियोजनबद्ध आयोजन केले. ही परिषद “शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन शिक्षक संघटना” यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार