शिरोली ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाने संतापाचा ज्वालामुखी ; आरोपींना फाशी द्या, कराड कनेक्शन उघड करण्याची मागणी हिंदू एकता आंदोलन आक्रमक ; “दोषींना पाठीशी घातल्यास रस्त्यावर उतरू” पोलिसांना थेट इशारा
कराड : ( विद्या मोरे ) शिरोली येथे घडलेल्या कथित ‘लव्ह जिहाद’ आणि अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली असून, या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच कराडमधील त्यांच्या साथीदारांची सखोल चौकशी करून संपूर्ण रॅकेट उघड करावे, अशी आक्रमक मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने करण्यात आली.
कराड शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे यांना निवेदन देत आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. “महिलांवर अत्याचार करणाऱ्या आणि समाजात भीती निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. पोलिसांनी कोणताही दबाव न घेता कठोर कारवाई करावी,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिलेल्या निवेदनात, या प्रकरणातील मुख्य आरोपीचा एक साथीदार कराडमधील असल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. संबंधित आरोपी आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींनी कराड परिसरातील इतर महिला किंवा मुलींना लक्ष्य केले आहे का, याची कसून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
“हे केवळ एका मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण नसून समाज अस्वस्थ करणारी गंभीर घटना आहे. अशा नराधमांना कठोर शिक्षा झाली नाही तर भविष्यात अशा घटना वाढतील,” असा संतप्त सूर आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात प्रभावी बाजू मांडावी, तसेच दोषींना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. तपासात हलगर्जीपणा झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी जिल्हा संघटक अजय पावसकर, शहराध्यक्ष प्रकाश जाधव, कराड दक्षिण तालुका अध्यक्ष दिग्विजय मोरे, शहर संघटक सागर निकम, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जाधव, कराड उत्तर कार्याध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी, अमोल थोरात, सुनील व्हावळ, प्रजोत कदम, ओंकार पावसकर, निलेश शानबाग, ओंकार लाहीगडे यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment