नसरापूरच्या अमानुष घटनेने राज्य संतप्त आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा द्या उद्योगिनी फाउंडेशनची आक्रमक मागणी

 कराड : विद्या मोरे
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या निष्पाप बालिकेवर ६५ वर्षीय भीमराव कांबळे याने अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ कराड येथील उद्योगिनी फाउंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले असून आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची आक्रमक मागणी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर शहरात निषेध रॅली काढण्यात आली. संतप्त नागरिक व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभागी होत प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. रॅलीनंतर पोलीस अधीक्षक  दत्तात्रय दराडे यांना निवेदन सादर करण्यात आले.

संस्थापक अध्यक्षा सौ. सोनल भोसेकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत, “ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. अशा नराधम प्रवृत्तीच्या आरोपीस कोणतीही दया न दाखवता कठोरात कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे,” असे ठामपणे सांगितले. सरकारने प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला असला तरी न्याय प्रक्रियेत होणारा विलंब टाळून आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा सुनावावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना कराव्यात आणि महाराष्ट्र शासनाने "शक्ती कायदा" तातडीने अंमलात आणून महिलां व बालकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी करण्यात आली. “समाज आता अशा घटनांविरोधात गप्प बसणार नाही,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात कराडमधील विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. यामध्ये रोटरी क्लब, लायन्स क्लब, इनरव्हील क्लब, सकल हिंदू समाज, जीवन विद्या मिशन, रणरागिणी महिला संस्था, समस्त ब्राह्मण संघटना, आस्था संस्था, आदिवासी कल्याण आश्रम, इंडियन मेडिकल असोसिएशन, आदी संघटनांचा समावेश होता. सर्वांनी एकमुखाने आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करत प्रशासनाला ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले.

या आंदोलनाचे नियोजन सोनल भोसेकर, सायली मिरजकर, सारिका पाटील, प्रेमळ शहा, छाया पवार, निमा काळे, इलाजोगी, मंजिरी कुस्पे, जयंत बेडेकर, डॉ. राहुल फासे,  डॉ. अंजनी शहा, डॉ. अनघा राजगुरू, डॉ. वर्षा देशपांडे, सोफिया  कागदी, अजय ओझा , शुभांगी कांबळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार