नसरापूरच्या अमानुष घटनेने संतापाची लाटआरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा द्याकराड आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशनचे पोलीस प्रशासनाला निवेदन
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे निष्पाप अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून या नराधम कृत्याविरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दि. कराड आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने कराड शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
“चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या आरोपीला कोणतीही दया न दाखवता कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशा नराधमांमुळे समाजातील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून महिलांमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,” अशी तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
तसेच राज्यात वाढत चाललेल्या महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, अशा प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालयातून खटले चालवून आरोपींना त्वरित शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली. समाजातील विकृत प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शासन आणि पोलीस प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष लक्ष्मण पांढरपट्टे, सचिव अमित उंब्रजकर, तसेच अविनाश शहा, सतीश पाटील, रवींद्र सावंत, प्रशांत आवले, अजिंक्य पाटील, दिग्विजय जनुगडे, संजीव शहा आणि सुधीर सुक्रे उपस्थित होते.
Comments
Post a Comment