शिकाऊ डॉक्टरांच्या हाती रुग्णांचे जीव? महिलांशी उद्धट वागणूक, रुग्णांची हेळसांड; नामांकित हॉस्पिटल्सच्या कारभारा विरोधात संताप बाहेरून चकाचक, आतून भोंगळ व्यवस्थेचा आरोप रुग्णांवर दुर्लक्ष, वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीप्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी करण्याची नागरिकांची मागणी
कराड : विद्या मोरे कराडातील नामांकित आणि मोठ्या हॉस्पिटल्समध्ये शिकाऊ डॉक्टरांच्या हाती थेट रुग्णांचे जीव सोपवले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात असून, महिलांशी होणारी उद्धट वागणूक, रुग्णांची हेळसांड आणि बेजबाबदार आरोग्यसेवा यामुळे संतापाची लाट उसळली आहे. बाहेरून अत्याधुनिक सुविधा आणि समाजसेवेचे चित्र उभे केले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक हॉस्पिटल्समध्ये परिस्थिती वेगळीच असल्याचा आरोप होत आहे.
अनेक रुग्ण आणि नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, गंभीर रुग्णांकडे वेळेवर लक्ष दिले जात नाही. अनुभवी डॉक्टरांऐवजी प्रशिक्षणार्थी आणि शिकाऊ डॉक्टर, अनुभव नसलेले कर्मचारी व नर्स यांच्या भरोशावर उपचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वेळा वरिष्ठ डॉक्टर प्रत्यक्ष उपस्थित नसताना फोनवरून सूचना देतात, तर इंजेक्शन, सलाईन आणि औषधांबाबत गोंधळ उडत असल्याच्याही तक्रारी पुढे येत आहेत.
महिला रुग्णांशी अपमानास्पद भाषेत बोलणे, त्यांच्या वेदना गांभीर्याने न घेणे, नातेवाईकांना उर्मट उत्तर देणे आणि प्रश्न विचारल्यास उद्धटपणे वागणे अशा प्रकारांमुळे संताप अधिक वाढत आहे. “रुग्ण उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जातो, अपमान सहन करण्यासाठी नाही,” अशी भावना आता सर्वसामान्य नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत.
जनरल वॉर्डमधील अस्वच्छता, वेळेवर उपचार न मिळणे, गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांकडे दुर्लक्ष, तर पैशांच्या आणि ओळखीच्या आधारावर काहींना वेगळी वागणूक दिली जात असल्याचे आरोपही नागरिकांनी केले आहेत.
“बाहेरून दाखवले जाणारे चित्र आणि आतली वास्तव परिस्थिती यात मोठी तफावत आहे. हॉस्पिटल म्हणजे उपचाराचे ठिकाण की पैशांचा बाजार?” असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, आरोग्य विभागाने अशा हॉस्पिटल्सची अचानक तपासणी करून प्रत्यक्ष परिस्थिती जनतेसमोर आणावी, महिला रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी, शिकाऊ डॉक्टरांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवावे आणि रुग्णांशी होणाऱ्या वर्तनाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
Comments
Post a Comment