“एकाच छताखाली शासकीय योजनांचा लाभ; ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ कराडकरांसाठी ठरले दिलासादायक”समाधान शिबिरात प्रमाणपत्रे, दाखले व विविध योजनांचा लाभ; प्रशासन आणि नागरिकांमध्ये थेट संवाद
कराड : विद्या मोरे
महाराष्ट्र शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत कराड नगरपरिषदेच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे दि. ८ मे रोजी भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांच्या विविध प्रशासकीय अडचणी एकाच ठिकाणी सोडवून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. श्री. राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी मा. अतुल म्हेत्रे, तहसीलदार मा. कल्पना ढवळे, उपनगराध्यक्ष मा. प्रतापराव साळुंखे, नगरसेवक मा. जयंतकाका पाटील, मुख्याधिकारी मा. प्रशांत व्हटकर, बांधकाम सभापती मा. अख्तरहूसेन आंबेकरी, पाणीपुरवठा सभापती मा. अल्ताफभाई शिकलगार, महिला व बालकल्याण सभापती मा. रुपाली माने, नगरसेवक मा. प्रवीण पवार, मा. राहुल भोसले, मा. नरेंद्र लिबे, मा. फारुखभाई पटवेकर, मा. विष्णूकाका पाटसकर, मा. रोहन विभूने यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. अनेक नागरिकांनी विविध दाखले, प्रमाणपत्रे, महसूल विषयक कागदपत्रे आणि योजनांबाबत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरामुळे नागरिकांना विविध कार्यालयांचे हेलपाटे मारण्यापासून दिलासा मिळाला. महसूल, नगरपरिषद व इतर शासकीय विभागांनी एकत्रितपणे नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे “शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या योजना प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सहज आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कराड नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध विभागांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि लोकाभिमुख वातावरणात पार पडला.
Comments
Post a Comment