कराड नगर परिषदेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा गौरव“विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार” प्राप्त साहित्यिकांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार

 
कराड  विद्या मोरे :                                                 महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या “विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार”ाने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक मा. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा कराड नगर परिषद, कराड यांच्या वतीने समस्त कराडकरांच्या वतीने मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण औदुंबर व अंकलखोप येथे झाले असून पुढील शिक्षण त्यांनी सांगली येथील अनाथ विद्यार्थी आश्रम संस्थेत राहून पूर्ण केले. त्यांचे वडील व आजोबा हे दोघेही उत्कृष्ट चित्रकार असल्याने बालपणापासूनच त्यांच्यावर कलेचे संस्कार झाले. औदुंबरच्या निसर्गरम्य वातावरणाचा, मातीतल्या सुगंधाचा आणि धार्मिक परंपरेचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर खोल प्रभाव पडला. याच संस्कारांतून त्यांचे संवेदनशील, निगर्वी, व्रतस्थ आणि प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तिमत्त्व घडले.
श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे मराठीतील प्रख्यात ललित लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या “डोह”, “सोन्याचा पिंपळ”, “पाण्याचे पंख” आणि “कोरडी भिक्षा” या साहित्यकृती विशेष गाजल्या असून त्यांच्या अभिजात, निसर्गनिष्ठ आणि संवेदनशील लेखनशैलीची साक्ष देतात.

गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ त्यांनी साहित्य क्षेत्रात मोलाची सेवा बजावली असून त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले आहे. यापूर्वीही त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने “साहित्य रत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या प्रदीर्घ साहित्यसेवेचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने “विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करून त्यांच्या साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा सन्मान केला आहे.

यावेळी आयोजित सत्कार समारंभात नगराध्यक्ष मा. श्री. राजेंद्रसिंह यादव म्हणाले, “आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी हे कराड शहराच्या साहित्यिक क्षेत्रातील अमूल्य ठेवा आहेत. गेली ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी साहित्य क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी ही कराड शहरासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आयोजित साहित्य संमेलनांना विशेष दिशा मिळाली. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान असलेला ‘विंदा करंदीकर पुरस्कार’ प्राप्त होणे ही संपूर्ण कराड शहरासाठी गौरवाची बाब असून नगरपालिकेच्या वतीने त्यांचा सत्कार करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.”

या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष मा. श्री. प्रतापराव साळुंखे, नगरसेवक व लोकशाही आघाडी अध्यक्ष मा. श्री. जयंतकाका पाटील, बांधकाम सभापती ma. श्री. अख्तरभाई आंबेकरी, पाणीपुरवठा सभापती मा. श्री. अल्ताफभाई शिकलगार, नगरसेवक मा. श्री. सुहास पवार, नगरसेवक मा. श्री. नरेंद्र लिबे, मुख्याधिकारी मा. श्री. प्रशांत व्हटकर तसेच मा. श्री. सौरभ तात्या पाटील, मा. श्री. फारुखभाई पटवेकर, मा. श्री. सुरेश नाना पाटील, मा. श्री. जयंत दादा बेडेकर, श्री. सुधीर एकांडे व श्री. उदयन श्रीनिवास कुलकर्णी यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार