आत्मदहनाच्या इशाऱ्यापासून राज्य नेतृत्वापर्यंतचा संघर्ष; इम्रान मुल्ला यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
कराड : विद्या मोरे
बेरोजगार युवक-युवतींच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे, अन्यायाविरोधात आक्रमक आंदोलनांनी प्रशासनाला हादरे देणारे आणि समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने आवाज उठवणारे युवा नेतृत्व इम्रान मुल्ला यांची राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे राज्यातील बेरोजगार तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून युवकांच्या प्रश्नांना आता अधिक ताकदीचा आवाज मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
कराड येथे संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. महारुद्र तीकुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष श्री. तीकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इम्रान मुल्ला यांच्या नावाची अधिकृत घोषणा करत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यकर्त्यांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
इम्रान मुल्ला यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बेरोजगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. सुशिक्षित युवक-युवतींना रोजगार मिळावा, भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असावी, स्थानिक युवकांना न्याय मिळावा आणि शासनाने रोजगार निर्मितीसाठी ठोस धोरण राबवावे यासाठी त्यांनी अनेक आंदोलने उभी केली. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा देत शासनाला धारेवर धरले होते. त्यांच्या या आंदोलनाची राज्यभर मोठी चर्चा झाली होती.
तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी रस्ता रोको आंदोलन करत शासन आणि प्रशासनाला थेट जाब विचारला. बेरोजगारांच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका युवकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या भरती प्रक्रियेत स्थानिक युवकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी बँकेसमोर टाळे ठोको आंदोलन छेडले होते. या आंदोलनामुळे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना दखल घ्यावी लागली होती.
नोकरी संदर्भातील विविध मागण्यांसाठी त्यांनी बेमुदत प्राणांतिक उपोषण केले होते. बेरोजगार युवक-युवतींच्या न्यायासाठी जीवाची पर्वा न करता लढा देणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. केवळ आंदोलनच नव्हे तर स्वयंरोजगार, लघुउद्योग, युवकांना प्रशिक्षण, शासकीय योजनांचा लाभ, कर्जसहाय्य आणि सामाजिक न्याय या विषयांवरही त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यामुळेच संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आदर निर्माण झाला आहे.
संघटनेने त्यांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना राज्यभर अधिक मजबूत होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना इम्रान मुल्ला म्हणाले, “हे पद माझ्यासाठी सन्मान नसून राज्यातील लाखो बेरोजगार युवक-युवतींची जबाबदारी आहे. बेरोजगारांच्या प्रश्नांवर संघटना आणखी आक्रमक भूमिका घेईल. युवकांना न्याय, रोजगार आणि हक्क मिळवून देण्यासाठी राज्यभर संघर्ष उभारला जाईल. गरज पडल्यास तीव्र आंदोलनेही केली जातील.”
या कार्यक्रमास सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सागर लादे, कराड तालुका दक्षिण अध्यक्ष विशाल यटम, कराड तालुका उपाध्यक्ष मारुती माने, कराड तालुका कार्याध्यक्ष साजिद मुल्ला, कराड तालुका उत्तर अध्यक्ष सचिन भिसे, कराड तालुका महिला आघाडी अध्यक्ष मयुरी लादे, कराड तालुका महिला आघाडी कार्याध्यक्ष रुपाली यटम तसेच कराड तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष साधना सागरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी इम्रान मुल्ला यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीमुळे राज्यातील बेरोजगारांच्या लढ्याला आता नवे नेतृत्व आणि नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment