१४ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश; साखरी लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी ४७.८८ कोटींचा निधी मंजूरभरत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; हजारो शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मार्ग मोकळा
कराड : प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरातील साखरी लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या प्रलंबित कामांसाठी तब्बल ४७.८८ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली तब्बल १४ वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाला अखेर गती मिळाल्याने हजारो शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान परिसरातील जनतेला दिलेला शब्द भाजप नेते भरत पाटील (नाना) यांनी सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या माध्यमातून पूर्ण केल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करत त्यांनी या प्रश्नाला प्राधान्य दिले होते.
साखरी धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सूर्यकांत उर्फ राजू काळे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पासाठी गेली १४ वर्षे सातत्याने लढा सुरू होता. प्रकल्पातील तांत्रिक अडचणी, रखडलेली कामे आणि अपूर्ण सिंचन व्यवस्था यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. संघर्ष समितीने वेळोवेळी आंदोलने, निवेदने आणि बैठका घेत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सातारा कार्यालयामार्फत सुधारित प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर शासन स्तरावर पाठपुरावा वाढवण्यात आला आणि अखेर या प्रकल्पातील प्रलंबित कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली.
या निधीतून काळगाव जॅकवेल दुरुस्ती, सांडव्याचे काँक्रीटीकरण, रिंग रोडची कामे तसेच प्रस्तावित चार केटी वेअरची उभारणी करण्यात येणार आहे. याशिवाय धामणी, कुठरे, सुपुगडेवाडी आणि वाझोली गावांसाठी सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे सुमारे ३१६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून परिसरातील शेतीला मोठा फायदा होणार आहे.
२०११ पासून प्रकल्प विविध कारणांमुळे रखडला होता. धरणाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक असलेला रिंग रोड अपूर्ण राहणे, जॅकवेल यंत्रणा नादुरुस्त असणे तसेच सांडव्याची कामे रखडल्यामुळे प्रकल्पाचे काम पुढे सरकत नव्हते. मात्र संघर्ष समिती आणि स्थानिकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री , पाटबंधारे मंत्री तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे या कामांना मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले.
या निर्णयानंतर काळगाव जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांनी भाजप नेते भरत पाटील (नाना) तसेच साखरी धरण संघर्ष समितीचे आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment