सातारा जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नामदेव पाटील संघटनात्मक कामाची दखल; काँग्रेस नेतृत्वाकडून मोठी जबाबदारी

 कराड  : विद्या मोरे  ; काँग्रेसचे सक्रिय नेते तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय नामदेव पाटील यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या नियुक्तीची घोषणा केली. नामदेव पाटील यांच्या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला नवे नेतृत्व मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये सातत्याने सक्रिय राहून पक्षवाढीसाठी केलेल्या कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे बोलले जात आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडे कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. अल्पावधीतच त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गावागावांत संपर्क मोहीम राबवत कार्यकर्त्यांचे जाळे अधिक सक्षम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध राजकीय व सामाजिक कार्यक्रमांचे प्रभावी आयोजन करण्यात आले होते.

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही नामदेव पाटील यांनी प्रभावी नेतृत्व करत काँग्रेसची ताकद दाखवून दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्नी सुनंदा पाटील यांनी विजय मिळवला होता. तसेच कराड पंचायत समितीच्या वारूंजी गणात रवींद्र बडेककर यांना विजयी करून काँग्रेसचे वर्चस्व अधिक बळकट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवून संघटन वाढविण्यात त्यांनी विशेष लक्ष दिल्याचे मानले जाते.

गेल्या महिन्यात काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांनी सातारा जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून मते जाणून घेतली होती. त्यावेळी नामदेव पाटील यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याचे सांगितले जात होते. संघटनात्मक कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेला जवळचा संपर्क आणि पक्षनिष्ठा या गुणांच्या जोरावर त्यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन केला.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना नामदेव पाटील म्हणाले, “काँग्रेस पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मोठी आहे. सर्वांना सोबत घेऊन सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा सक्षम आणि मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष संघटना अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न राहतील.”

राजकारण, समाजकारण आणि उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे ५३ वर्षीय नामदेव पाटील यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. वारूंजी गावचे सरपंच, कराड पंचायत समिती सदस्य तसेच वीट भट्टी संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

त्यांच्या नियुक्तीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी स्वागत करत अभिनंदन केले आहे. सातारा जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी देण्याची क्षमता नामदेव पाटील यांच्या नेतृत्वात असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार