मराठ्यांचा इतिहास विकृत करण्याचे षड्यंत्र : पैगंबर शेख द्वेषाच्या राजकारणाला प्रबोधनातून उत्तर देण्याचे आवाहन; अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे व्याख्यान संपन्न
कराड : विद्या मोरे ; छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सोईस्करपणे आणि अर्धवट स्वरूपात समाजासमोर मांडून तरुण पिढीची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विविध माध्यमांतून मराठ्यांचा इतिहास पुसून टाकण्याचे षड्यंत्र रचले जात असून, या प्रवृत्तीला प्रबोधन, संवाद आणि इतिहासाच्या सखोल अभ्यासातून उत्तर देण्याची गरज आहे, असे परखड प्रतिपादन सुधारणावादी विचारवंत पैगंबर शेख यांनी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, बांधकाम सभापती अख्तर आंबेकरी, दिलीप गुरव, अनिल घराळ, विवेक कुराडे-पाटील, अशोकराव पाटील, सागर बर्गे, नरेंद्र लिबे, विद्या मोरे, संदीप काळे आणि सूरज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पैगंबर शेख म्हणाले, महाराष्ट्राची ओळख ही संत, समाजसुधारक आणि पुरोगामी विचारांच्या परंपरेतून निर्माण झाली आहे. मात्र इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांना जाणीवपूर्वक वादाच्या भोवऱ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकालाही विरोध झाला होता, हे इतिहासाचे वास्तव आहे. आजही त्यांच्या कार्याचे महत्त्व कमी करण्यासाठी विविध माध्यमांतून चुकीचे लिखाण आणि दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
छत्रपती संभाजी महाराजांचा लढा केवळ धर्मासाठी होता, असा प्रचार करून इतिहासाला संकुचित चौकटीत बसवले जात आहे. प्रतापगडाच्या लढाईत कोण कोणत्या बाजूने उभे होते, याचा वस्तुनिष्ठ अभ्यास झाला तर इतिहासाचे अनेक पैलू स्पष्ट होतील, असे ते म्हणाले. हिंदू-मुस्लीम समाजात द्वेष निर्माण होईल, इतकाच इतिहास जाणीवपूर्वक पुढे आणला जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
शिवरायांचे दैवीकरण करून त्यांच्या विचारांचा सामाजिक उपयोग कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांच्या कार्याचा उपयोग समाज जोडण्यासाठी व्हायला हवा; मात्र काही प्रवृत्ती त्यांच्या नावावरून समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत.
देशात पूर्वी हिंदू आणि मुस्लीम समाज गुण्यागोविंदाने राहत होता. गावोगावी होणाऱ्या जत्रा-यात्रांमध्ये मुस्लीम समाजालाही मानाचे स्थान होते. मात्र सध्याच्या द्वेषमूलक राजकारणामुळे समाजात दुरावा वाढत चालला आहे. या परिस्थितीस काही प्रमाणात मुस्लीम समाजही जबाबदार असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. समाजातील द्वेषाची मालिका थांबून संवाद आणि सहअस्तित्वाची भावना वाढली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
सम्राट अकबराने श्रीराम आणि सीतेची प्रतिमा असलेली नाणी चलनात आणली होती, तर टिपू सुलतानच्या अंगठीवर ‘राम’ हे अक्षर कोरलेले होते. मात्र असा इतिहास जाणीवपूर्वक लोकांपासून दूर ठेवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. संभाजी महाराजांच्या हत्येमुळे रयतेचे जितके नुकसान झाले, त्याहून अधिक नुकसान मराठी साहित्य आणि विचारविश्वाचे झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
अफझलखानाची कबर आणि औरंगजेबाची कबर या मराठ्यांच्या शौर्याच्या इतिहासाच्या साक्षी असल्याचे सांगत इतिहासाकडे व्यापक आणि चिकित्सक दृष्टीने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक चव्हाण यांनी केले.
Comments
Post a Comment