काँग्रेसचे तारणहार : जिल्हाध्यक्ष नामदेव काशिनाथ पाटील यांचा आज वाढदिवस व सत्कार सोहळा
कराड : विद्या मोरे ; जिद्द, प्रचंड मेहनत, प्रामाणिकपणा आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची नेतृत्वशैली यांच्या जोरावर शून्यातून स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करणारे काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष नामदेव काशिनाथ पाटील अर्थात आप्पा यांचा आज गुरुवार, दि. २८ मे रोजी वाढदिवस होत आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे येत उद्योग, समाजकारण आणि राजकारणात वेगळी छाप निर्माण करणाऱ्या आप्पांचा संघर्षमय प्रवास आज अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शेतकरी कुटुंबातून उद्योगविश्वापर्यंतचा प्रवास
वारुंजी (ता. कराड) येथील कै. काशिनाथ पाटील आणि कै. कुसुम पाटील यांच्या कुटुंबात जन्मलेल्या नामदेव पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःची वाट निर्माण केली. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ज्येष्ठ बंधू बाळासाहेब पाटील (आबा) आणि मुकुंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेती, दुग्ध व्यवसाय आणि वीटभट्टी व्यवसायातून उद्योग क्षेत्रात पहिले पाऊल टाकले.
यानंतर जमीन खरेदी-विक्री आणि बांधकाम क्षेत्रात त्यांनी घेतलेली झेप मोठी ठरली. कराड, मलकापूर, कार्वे नाका, मुंढे, वारुंजी आणि गोटे परिसरात उभारलेले भव्य निवासी व व्यावसायिक प्रकल्प हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक मानले जातात. अल्पावधीतच “सत्यजित ग्रुप” हा विश्वासार्ह ब्रँड म्हणून पश्चिम महाराष्ट्रात ओळख निर्माण करण्यात त्यांना यश आले.
“सत्यजित ग्रुप”ची यशोगाथा ठरली प्रेरणादायी
वीटभट्टी व्यवसायातून सुरू झालेली वाटचाल आज विविध उद्योगांपर्यंत पोहोचली आहे. कोणतेही काम कमी न समजता सातत्याने मेहनत करण्याची वृत्ती हेच आप्पांच्या यशाचे गमक मानले जाते. उद्योग क्षेत्रात आलेल्या संकटांचा अनुभव घेत त्यांनी २००५ मध्ये “सत्यजित पतसंस्था” स्थापन केली.
आज ही संस्था सुमारे २०० कोटींच्या व्यवसायाच्या उंबरठ्यावर असून हजारो शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि युवा उद्योजकांना आर्थिक आधार देण्याचे काम ती करत आहे. “सत्यजित” या नावाने उभा राहिलेला विश्वास हा त्यांच्या प्रामाणिक व्यवहारातूनच निर्माण झाल्याचे बोलले जाते.
हॉटेल व्यवसायातही यशस्वी झेप
सत्यजित विट्स या फाईव्ह स्टार हॉटेलच्या माध्यमातून नामदेव पाटील यांनी हॉटेल व्यवसायातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व आधुनिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प ठरला आहे.
सध्या या प्रकल्पामध्ये तीन मजली शॉपिंग मॉल आणि मल्टिप्लेक्स थिएटर उभारणीचे कामही सुरू असून भविष्यात हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रातील आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याची चर्चा आहे.
राजकारणातही प्रभावी नेतृत्व
ग्रामपंचायत सरपंच ते पंचायत समिती सदस्य असा प्रवास करताना नामदेव पाटील यांनी स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व सिद्ध केले. अलीकडील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला मिळवून दिलेले यश हे त्यांच्या संघटन कौशल्याचे उदाहरण मानले जाते.
पृथ्वीराज चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. वारुंजी पंचक्रोशीतील विविध विकासकामांमुळे त्यांनी जनतेत मजबूत संपर्क निर्माण केला. सर्व पक्षातील नेत्यांशी स्नेहपूर्ण संबंध, संयमी स्वभाव आणि कार्यकर्त्यांना कायम साथ देणारे नेतृत्व यामुळे जिल्हा राजकारणात त्यांचे नाव प्रभावीपणे पुढे येत आहे.
काँग्रेस संघटना बळकट करण्याचा निर्धार
सातारा जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार नामदेव पाटील यांनी व्यक्त केला होता. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, युवकांना पक्षाशी जोडणे आणि ग्रामीण भागात काँग्रेस अधिक सक्षम करणे यावर त्यांचा विशेष भर असल्याचे मानले जाते.
कुटुंबाची एकजूट हेच यशाचे रहस्य
पाटील कुटुंब आजही एकत्रितपणे कार्यरत असून कुटुंबातील एकवाक्यता आणि परस्पर सहकार्य हेच त्यांच्या यशाचे मुख्य कारण मानले जाते. उद्योग, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात मोठे यश मिळवूनही साधेपणा कायम ठेवणारे नेतृत्व म्हणून नामदेव पाटील (आप्पा) यांच्याकडे पाहिले जाते.
आज होणार भव्य अभीष्टचिंतन सोहळा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष नामदेव काशिनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जिल्हाध्यक्षपदी निवडीबद्दल आज गुरुवार दि. २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता सत्यजित विट्स येथे भव्य जाहीर सत्कार व अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
राजकारण, समाजकारण आणि उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या आप्पांच्या कार्याचा गौरव करणारा हा सोहळा कराड तालुक्यासाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरत आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जि.प. सदस्या सौ. सुनंदा नामदेव पाटील (माई) आणि बाळासाहेब काशिनाथ पाटील यांनी केले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Comments
Post a Comment