लायन्स महाराष्ट्राच्या राज्य सचिवपदी डॉ. वीरेंद्र चिखले यांची बहुमताने निवड कोकणाच्या सामाजिक कार्याला राज्यस्तरावर मिळाला मान; खेड लायन्स क्लबमध्ये उत्साहाचे वातावरण
पुण्यात भव्य राज्य लायन्स कॉन्फरन्स
खेड : लायन्स महाराष्ट्र राज्य (मल्टिपल ३२३४) च्या सन २०२६-२७ या कार्यकाळासाठी राज्य सचिवपदी कोकणातील ज्येष्ठ लायन व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व डॉ. वीरेंद्र विद्याधर चिखले यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. खेड लायन्स क्लबच्या इतिहासात प्रथमच राज्य सचिवपदाचा मान मिळाल्याने खेड तालुक्यासह संपूर्ण कोकणात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे येथे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ५०० हून अधिक लायन्स पदाधिकारी, प्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य राज्य लायन्स कॉन्फरन्स उत्साहात पार पडली. या परिषदेत राज्य (मल्टिपल) अध्यक्षपदी नागपूर येथील लायन भरत बलघट यांची निवड जाहीर करण्यात आली, तर राज्य सचिवपदी डॉ. वीरेंद्र चिखले यांच्या नावाची घोषणा होताच उपस्थित सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
सामाजिक कार्याची राज्यस्तरावर दखल
डॉ. चिखले यांनी प्रांतपाल म्हणून कार्य करताना सात जिल्ह्यांमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पर्यावरणविषयक उपक्रम प्रभावीपणे राबवले होते. ग्रामीण भागातील आरोग्य शिबिरे, नेत्रतपासणी मोहिमा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबिरे, महिला सक्षमीकरण उपक्रम आणि आपत्तीग्रस्तांना मदत अशा अनेक सेवा प्रकल्पांमुळे त्यांचे नेतृत्व राज्यभर चर्चेत राहिले.
६४ पुरस्कारांनी प्रांताचा गौरव
त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या कार्याची दखल घेत संबंधित प्रांताला विविध क्षेत्रांतील तब्बल ६४ पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तसेच लायन्स क्लब खेडलाही वैयक्तिक व क्लब स्तरावर एकूण १२ पुरस्कार प्राप्त झाले. या यशामुळे खेड लायन्स क्लबची राज्यभरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती
लायन्स मल्टिपल कॉन्सिल चेअरपरसन लायन विजय सारडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमाला नागपूरचे महाराज मुधोजीराजे भोसले, विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगदीश पुरोहित यांचे मनोगत
यावेळी लायन जगदीश पुरोहित यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “डॉ. वीरेंद्र चिखले यांची राज्य सचिवपदी झालेली निवड ही खेड व कोकणासाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या नेतृत्वामुळे सामाजिक कार्याला नवी दिशा मिळेल.”
कोकणाच्या सामाजिक कार्याला नवी ऊर्जा
डॉ. चिखले यांच्या निवडीमुळे कोकणातील सामाजिक कार्याला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना लायन्स पदाधिकारी आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात अधिक प्रभावी सेवा प्रकल्प राबवले जातील, तसेच शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपत लायन्स चळवळीचा विस्तार अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या निवडीबद्दल लायन मंगेश दोशी, लायन नीलम पाटील यांच्यासह विविध स्तरांतील पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी डॉ. चिखले यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment