सर्वसामान्य सभासदांचा स्वाभिमान हाच आमचा विजयाचा पाया : अविनाश मोहिते ; कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत संस्थापक पॅनलचा निर्धार; १२० किलो विनामूल्य साखर, जादा ऊसदर व स्वस्त पाणीपट्टीची घोषणा

कराड  : विद्या मोरे
कराड : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थापक पॅनलचे प्रमुख व माजी अध्यक्ष अविनाश मोहिते आणि उमेदवार अर्चना मोहिते यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करत सभासदांसाठी मोठ्या आश्वासनांची घोषणा केली.

१७ वर्षांची परंपरा आणि सभासदांशी नाळ

अविनाश मोहिते म्हणाले, गेल्या १७ वर्षांपासून मोहिते कुटुंब कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सक्रिय आहे. माझे आजोबा आबासाहेब मोहिते आणि वडील जगन्नाथ मोहिते यांनीही कारखान्यात संचालक म्हणून काम केले आहे. अकरा वर्षांपूर्वी सर्वसामान्य सभासदांनी संस्थापक पॅनलला भरघोस पाठिंबा दिला होता. त्या काळात सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले गेले.
दोन रुपयांत साखर; शब्द पाळणारे नेतृत्व

संस्थापक पॅनल सत्तेत आल्यानंतर सभासदांना दरमहा पाच किलो साखर फक्त दोन रुपये किलो दराने पाच वर्षे देण्यात आली. बाजारभावाने मिळणारी साखर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात आणण्याचे आश्वासन पूर्ण केले, असे मोहिते यांनी सांगितले.

एफआरपीपेक्षा ३४१ कोटी अधिक ऊसदर

त्यांच्या कार्यकाळात कारखान्याने एफआरपीपेक्षा तब्बल ३४१ कोटी रुपये अधिक ऊसदराच्या स्वरूपात शेतकऱ्यांना दिल्याचा दावा त्यांनी केला. डिस्टिलरीचा नफा २६ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला, तसेच बिनपरतीची ठेवही सभासदांना परत देण्यात आली होती.
सिंचन योजनांसाठी स्वतंत्र वीज फिडर

इरिगेशन योजनांना वेळेवर वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत होत्या. त्या काळात स्वतंत्र वीज फिडर लाईन उभारून वेळेवर पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे अनेक भागांतील शेतीला दिलासा मिळाला होता.

निवडणुकांतील अनुभव आणि सध्याची लढत

२०१५ च्या निवडणुकीत मतमोजणीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्याबाबत सर्वांना माहिती आहे, असे सांगत मोहिते यांनी सूचक टीका केली. मागील निवडणुकीत मतविभाजनासाठी तिसरे पॅनल उभे राहिल्याचा आरोप करत त्यांनी यंदा संस्थापक पॅनल सर्व जागा लढवत असल्याचे स्पष्ट केले.
सर्वसामान्य सभासद हाच आमचा आधार

“सर्वसामान्य सभासदांचा स्वाभिमान आणि अस्तित्व हाच आमचा खरा बळ आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये हा विश्वास दिसून आला आहे. याही निवडणुकीत सभासद मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देतील,” असा विश्वास अविनाश मोहिते यांनी व्यक्त केला.

अनेक दिग्गज नेत्यांशी संपर्क

निवडणुकीपूर्वी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, मानसिंगराव नाईक, मोहनराव कदम, संग्राम देशमुख, आमदार मनोज घोरपडे, उदयसिंह पाटील, सम्राट महाडिक यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्रकृती अस्वस्थ असूनही सभासद आणि नेत्यांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सभासदांचे कुटुंब म्हणूनच काम केले” : अर्चना मोहिते

संस्थापक पॅनलच्या उमेदवार अर्चना मोहिते म्हणाल्या, “आमच्या कुटुंबाने नेहमीच कारखान्याच्या सभासदांना आपल्या कुटुंबाचा भाग मानले आहे. सुखदुःखात सहभागी होण्याची परंपरा कायम ठेवली आहे.”

दादांच्या प्रकृतीमुळे जबाबदारी स्वीकारली

अविनाश मोहिते यांच्या प्रकृतीच्या अडचणी लक्षात घेऊन कार्यकर्ते आणि सभासदांच्या आग्रहातून आपण पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. “दादांनी ज्या पद्धतीने लोकांशी संपर्क ठेवला, त्याच पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे,” असे त्या म्हणाल्या.

वेळेवर ऊसतोड आणि पाण्याचा प्रश्न गंभीर

आज शेतकऱ्यांसमोर वेळेवर ऊसतोड होत नसल्याचा मोठा प्रश्न आहे. उपसा जलसिंचन योजना गैरव्यवस्थापनामुळे अडचणीत आल्या असून काही योजना बंद पडल्याचा आरोप त्यांनी केला. वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस वाळत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाणीपट्टीवर जोरदार टीका

सध्या पाणीपट्टी टनावर आकारली जात असून शेतकऱ्यांना १५ ते १७ हजार रुपये मोजावे लागत आहेत. ही पद्धत बंद करून पाणीपट्टी थेट पैशांमध्ये आकारली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

सभासदांना दिली जाणारी साखर निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करत त्यांनी कारखान्यावर सभासदांच्या समस्या ऐकण्यासाठी पदाधिकारी उपलब्ध नसल्याची टीका केली. “सर्व कारभार अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे,” असे त्या म्हणाल्या.

दहा हजार सभासदांचे शेअर्स अद्याप प्रलंबित

कारखाना पारदर्शक असल्याचा दावा केला जात असला तरी सुमारे दहा हजार सभासदांचे शेअर्स अद्याप वारसांच्या नावे हस्तांतरित झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. जमीन नसलेल्या सुमारे चार हजार कामगारांचाही प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थापक पॅनलची मोठी आश्वासने

दरवर्षी १२० किलो विनामूल्य साखर

सभासदांना दरवर्षी एक क्विंटल वीस किलो म्हणजेच १२० किलो साखर विनामूल्य देण्याचे आश्वासन संस्थापक पॅनलने दिले आहे. मात्र, “ही साखर कोणतीही फुकटची मदत नसून शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि त्यांच्या हक्काचे फळ आहे. त्यामुळे या योजनेचे वर्णन ‘मोफत’ किंवा ‘फुकट’ म्हणून करू नये,” असे अर्चना मोहिते यांनी स्पष्ट केले.

पाणीपट्टी ७५०० रुपये प्रतिएकर

टनावर आकारली जाणारी पाणीपट्टी बंद करून वार्षिक ७५०० रुपये प्रतिएकर दर आकारला जाईल. तसेच वर्षातून किमान १२ ते १५ पाणीपाळ्या देण्याचे आश्वासनही देण्यात आले.

एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्याचा शब्द

कारखान्याने पुन्हा एकदा एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्याचे वचन संस्थापक पॅनलने दिले आहे. “आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत,” असे सांगत अर्चना मोहिते यांनी आगामी जाहीरनाम्यात आणखी अनेक घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार