झाडांवर वीज वाहिन्यांचा जीवघेणा खेळ; प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा रस्त्यावर उतरू – इमरान मुल्ला
कराड : विद्या मोरे ; ओगलेवाडी रोडवरील जुनी कागद फॅक्टरी परिसरात महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून झाडांवरून वीजवाहिन्या टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेने केला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हा प्रकार नागरिकांच्या जीवाशी खेळणारा असून तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष इमरान मुल्ला यांनी दिला आहे.
नियम धाब्यावर बसवून वीजवाहिन्या; नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ
संघटनेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित परिसरात वीजवाहिन्या थेट झाडांवरून नेण्यात आल्या आहेत. वादळी वाऱ्यात झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांना घासत असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हलणारा वीजखांब बनला मृत्यूचा सापळा
या भागातील जुना सिमेंटचा वीजखांबही सध्या धोकादायक स्थितीत असून तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. शाळकरी मुले, नागरिक आणि वाहनधारक याच मार्गाने ये-जा करतात. त्यामुळे प्रशासनाने दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुर्घटना झाल्यास जबाबदारी कोणाची?
पावसाळ्यात झाडे कोसळणे, वीजवाहिन्या तुटणे किंवा विद्युतप्रवाह झाडांमध्ये उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा स्पष्ट इशारा संघटनेने दिला आहे.
आठ दिवसांत कारवाई करा; अन्यथा तीव्र जनआंदोलन अटळ
वारंवार सूचना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास संघटना गप्प बसणार नाही. आठ दिवसांच्या आत झाडांवरून टाकलेल्या वीजवाहिन्या हटवून धोकादायक खांब बदलण्यात यावा. अन्यथा राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या नेतृत्वाखाली तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा निर्वाणीचा इशारा प्रदेशाध्यक्ष इमरान मुल्ला यांनी दिला आहे.
निवेदन सादर
प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रदेशाध्यक्ष इमरान मुल्ला, जिल्हा कार्याध्यक्ष सागर लादे, तालुका कार्याध्यक्ष साजिद मुल्ला, रवींद्र कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment