अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षपदी मा.भानुदास माळी यांची निवड
नवी दिल्ली : मा.भानुदास शंकर माळी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या नियुक्तीस मंजुरी दिली असून ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी यासंदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले.
भानुदास माळी हे काँग्रेस पक्षातील सक्रिय आणि संघटनात्मक पातळीवर सातत्याने काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम केले आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
काँग्रेस पक्षाकडून देशभरात ओबीसी समाजाशी संवाद वाढविण्यावर विशेष भर दिला जात असून त्या पार्श्वभूमीवर भानुदास माळी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे. आगामी काळात ओबीसी समाजातील तरुणांना पक्षाशी जोडणे, सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणे तसेच संघटनात्मक काम अधिक मजबूत करणे या दृष्टीने ते काम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या नियुक्तीनंतर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांकडून भानुदास माळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा पक्षाला मोठा फायदा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment