कृष्णा नदी प्रदूषणावर स्वयंरोजगार संघटना आक्रमक कृष्णा पुलावर तातडीने निर्माल्य कलश बसवण्याची मागणीनदी पात्रात वाढता कचरा; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन
कराड ; विद्या मोरे
कराड येथील कृष्णा नदी पात्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येविरोधात युवा राज्य फाउंडेशन सलग्न सशिक्षित बेरोजगार स्वयंरोजगार संघटना आक्रमक झाली असून, कृष्णा पुलावर तातडीने निर्माल्य कलश (कचरा बकेट) बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कराड तसेच कराड नगरपालिका आरोग्य विभाग आणि मुख्याधिकारी यांना संघटनेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले.
निर्माल्य, प्लास्टिक थेट नदीत; प्रदूषणाचा गंभीर प्रश्न
संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कृष्णा पुलावरून अनेक नागरिकांकडून निर्माल्य, प्लास्टिक तसेच इतर कचरा थेट कृष्णा नदी पात्रात फेकला जात आहे. त्यामुळे नदीचे पावित्र्य धोक्यात येत असून प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. नदीकाठ परिसरात अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाल्याने पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनत चालल्याचे संघटनेने म्हटले आहे.
आत्महत्या रोखण्यासाठी जाळी बसली; आता स्वच्छतेसाठी उपायांची गरज
पूर्वी कृष्णा पुलावर घडणाऱ्या आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आंदोलने केली होती. त्यानंतर प्रशासनाने पुलावर संरक्षण जाळी बसवण्याचे काम पूर्ण केले. आता त्याचप्रमाणे नदी स्वच्छतेसाठीही प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.
सोशल मीडियावरून नदीची अवस्था समोर
सैदापूर येथील एका सामाजिक कार्यकर्त्या युवकाने सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून कृष्णा नदी पात्रातील घाणीचे वास्तव समोर आणले आहे. प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत असताना काही मंडळी त्याला ट्रोल करत असल्याची खंत संघटनेने व्यक्त केली. सामाजिक प्रश्न मांडणाऱ्यांवर टीका करण्याऐवजी प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थितीकडे गांभीर्याने पाहावे, असे संघटनेने स्पष्ट केले.
पुलाच्या दोन्ही बाजूंना निर्माल्य कलश बसवण्याची मागणी
कृष्णा नदीचे पावित्र्य टिकवण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना निर्माल्य कलश बसवण्यात यावेत तसेच नागरिकांनी नदीत कचरा टाकू नये यासाठी सूचना फलक व जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
हे निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इमरान मुल्ला, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सागर लादे, कराड तालुका कार्याध्यक्ष साजिद मुल्ला, रवींद्र कांबळे तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment