इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे मेलोडी चॉकलेट वाटप आंदोलन“मेलोडी इतकी चॉकलेटी का आहे?” म्हणत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका
कराड : विद्या मोरे ; पेट्रोल व डिझेलच्या सतत वाढत असलेल्या दरांविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने कराड येथे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटप करून केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. “मेलोडी इतकी चॉकलेटी का आहे?” या लोकप्रिय जाहिरातीतील वाक्याचा संदर्भ घेत आंदोलनकर्त्यांनी वाढत्या इंधन दरामुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात आलेली कडवट परिस्थिती अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, छोटे व्यावसायिक, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होत आहे. गॅस सिलेंडर, अन्नधान्य, भाजीपाला तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या वाढत्या दरामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट देत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. “इंधन दरवाढ थांबवा”, “महागाई कमी करा”, “सामान्य जनतेला दिलासा द्या” अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनाकडे वाहनधारक व नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले. अनेकांनी युवक काँग्रेसच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाचे कौतुक करत वाढत्या महागाईबाबत नाराजी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली. “महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असून पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे प्रत्येक कुटुंबाचा मासिक खर्च वाढला आहे. केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करून तातडीने नागरिकांना दिलासा द्यावा,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच आगामी काळातही जनतेच्या प्रश्नांसाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात सौ. सत्त्वशीला पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस सातारा जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजित पाटील चिखलीकर, युवक काँग्रेस सातारा जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अमित जाधव, तालुका अध्यक्ष देवदास माने, सातारा जिल्हा उपाध्यक्ष समीर इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष उदय जाधव, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, पंचायत समिती सदस्य रविंद्र बडेककर, कराड उत्तर अध्यक्ष प्रविण वेताळ, कराड दक्षिण अध्यक्ष चैतन्य पाटील, सातारा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष दिग्विजय जमाले, कराड उत्तर उपाध्यक्ष शहानूर देसाई, जिल्हा सरचिटणीस उमर फारूक, कराड दक्षिण उपाध्यक्ष खालीद पटेल, पाटण तालुका सोशल मीडिया अध्यक्ष रविराज पाटील यांच्यासह शिवाजीराव जमाले, तुषार लोंढे, दीलावर मुल्लानी, गणेश भोसले, सुरेश मदने, राहुल भिसे, मुकुंद पाटील, विक्रम पाटील, डॉ. दत्ता मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
Comments
Post a Comment