जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे दमदार शक्तिप्रदर्शन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद“गेल्या पाच वर्षांतील विकासकामे आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावर जयवंतराव भोसले सहकार पॅनेल मोठ्या मताधिक्याने विजयी होणार” – आ. डॉ. अतुलबाबा भोसले


कराड : विद्या मोरे

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने जोरदार शक्तिप्रदर्शन करत चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. कार्यकर्ते, सभासद आणि समर्थकांच्या प्रचंड उपस्थितीमुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळाले.  घोषणाबाजी आणि जल्लोषात निघालेल्या रॅलीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पॅनेलच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. ग्रामीण भागासह कारखाना कार्यक्षेत्रातील विविध गावांमधून आलेल्या शेतकरी सभासदांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. हातात झेंडे, बॅनर आणि पॅनेलच्या समर्थनार्थ घोषणांनी वातावरण उत्साहपूर्ण बनले होते.

यावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कार्यकर्ते आणि सभासदांना संबोधित करताना सांगितले की, “गेल्या पाच वर्षांत कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. आर्थिक शिस्त राखत विकासकामांना गती देण्यात आली. कारखान्याचा पारदर्शक आणि विश्वासार्ह कारभार केल्यामुळे सभासदांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला शेतकरी सभासद मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.”

चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनीही सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कारखान्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आगामी काळात कारखान्याला अधिक सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी विविध विकासात्मक योजना राबविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमास पॅनेलचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य, विविध कार्यकारी संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, युवक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी सभासद उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने निवडणुकीच्या रणांगणात जोरदार ताकद दाखविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार