वैद्यकीय बिल मंजुरीत मोठ्या भ्रष्टाचाराचा संशय रक्षक प्रतिष्ठानची सखोल चौकशीची मागणी; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
सातारा : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले मंजूर करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत रक्षक प्रतिष्ठान च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषींवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज बंडा माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले मंजुरीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे पाठविली यू जातात. मात्र ही बिले मंजूर करण्यासाठी संबंधित कार्यालयातून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून सातत्याने समोर येत होत्या.
दरम्यान, दि. २० मे २०२६ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक श्रीनिवास जोशी यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे वैद्यकीय बिल मंजुरी प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपांना अधिक बळ मिळाले आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या कार्यकाळात तसेच त्यानंतर मंजूर करण्यात आलेल्या सर्व वैद्यकीय बिलांची चौकशी करण्यात यावी. अनेक प्रकरणांमध्ये सुरुवातीला विविध कारणे देत नामंजूर करण्यात आलेली बिले नंतर मंजूर करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये आर्थिक व्यवहार, नियमबाह्य फेरफार अथवा शासनाची दिशाभूल झाली आहे का, याचा तपास होणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शासनाच्या नियमावलीत न बसणारी काही वैद्यकीय बिले लाच स्वीकारून मंजूर करण्यात आली असून शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची व आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीही अनेक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रकाराबाबत तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संबंधितांचे मनोबल वाढल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा रक्षक प्रतिष्ठान च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी अधिक पाटील, सुशील जाधव, वसीम शेख, वैभव पोतदार, अरिफ शेख आणि शोएब शिकलगार उपस्थित होते.
Comments
Post a Comment