कृष्णा कारखान्याच्या सत्तेसाठी महासंग्राम; सहकारच्या गडाला संस्थापकांचे थेट आव्हान!
२१ जूनला मतदान, २३ जूनला निकाल; पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या निवडणुकीत चुरशीची लढत
कराड : विद्या मोरे ; रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचू लागली आहे. २१ जून रोजी होणारे मतदान आणि २३ जून रोजी होणारी मतमोजणी यामुळे सातारा व सांगली जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रातील घडामोडींना वेग आला आहे. कारखान्याच्या सत्तेसाठी पुन्हा एकदा ‘सहकार’ आणि ‘संस्थापक’ गट आमनेसामने येण्याची चिन्हे दिसू लागल्याने निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.
सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची निवडणूक
पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावशाली सहकारी संस्थांमध्ये गणल्या जाणाऱ्या कृष्णा कारखान्याची निवडणूक ही केवळ संचालक मंडळापुरती मर्यादित राहत नाही. कराड, वाळवा, पलूस आणि कडेगाव या चार तालुक्यांतील ५० हजारांहून अधिक सभासद या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्याने या निवडणुकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे.
सहकार पॅनलची पुन्हा सत्ता कायम ठेवण्याची तयारी
विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत सर्व २१ जागांवर विजय मिळवत या पॅनलने कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. यंदाही गावपातळीवरील संघटनात्मक बांधणी, सभासद संपर्क आणि विकासकामांच्या जोरावर पुन्हा सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
संस्थापक पॅनलचे आव्हान अधिक आक्रमक
माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनलनेही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. विविध गावांमध्ये बैठका, सभासदांशी थेट संवाद आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संघटन बळकट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण तयार करून कारखान्याच्या सत्तेत परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार संस्थापक गटाकडून व्यक्त केला जात असल्याची चर्चा आहे.
तरुणांना संधी की ज्येष्ठांना विश्रांती?
यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी निश्चितीवरूनही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आमदार डॉ. अतुल भोसले यांनी नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेक नव्या चेहऱ्यांची नावे चर्चेत आली आहेत. दुसरीकडे, काही ज्येष्ठ संचालकांना यंदा विश्रांती दिली जाणार का, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या भूमिकेवर नजर
या निवडणुकीत डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रयत पॅनल स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार की एखाद्या गटाला पाठिंबा देणार, याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. मात्र त्यांच्या निर्णयामुळे अनेक मतदारसंघांतील राजकीय समीकरणे बदलू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
दिग्गज नेत्यांच्या हालचालींकडे लक्ष
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सातारा आणि सांगली जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील तसेच उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यासह अनेक नेते निवडणुकीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. त्यांच्या पाठिंब्याचा परिणाम काही मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरू शकतो.
थेट लढतीमुळे वाढणार चुरस
मागील निवडणुकीत विरोधकांमधील मतविभागणीचा फायदा सत्ताधारी गटाला झाला होता. मात्र यंदा प्रमुख गटांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. कारखान्याच्या सत्तेवर कोणाचे वर्चस्व राहणार, याचा फैसला आता सभासदांच्या मतपेटीतून होणार असून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे लागले आहे.
Comments
Post a Comment