मा. राजू शेट्टी, मा.आ. सदाभाऊ खोत, मा.महादेव जानकर, मा.आ.बच्चुभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा डॉ. अतुलबाबा भोसले, मनोजदादा घोरपडे व नितीन पाटील यांच्या हस्ते पत्रकार विकास भोसले लिखित ‘लोकशाहीतील स्वातंत्र्य सैनिक पंजाबराव पाटील’ पुस्तकाचे १८ मे रोजी कराडात भव्य प्रकाशन


कराड : विद्या मोरे 

शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी आणि जनआंदोलनांनी भरलेल्या जीवनप्रवासावर आधारित पत्रकार विकास भोसले लिखित ‘लोकशाहीतील स्वातंत्र्य सैनिक पंजाबराव पाटील’ या पुस्तकाचे भव्य प्रकाशन सोमवार दि. १८ मे रोजी सकाळी १० वाजता कराड येथील वेणूताई चव्हाण स्मारक येथे संपन्न होणार आहे. पूर्वा प्रकाशन, कराड यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक शेतकरी चळवळीतील संघर्ष, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा दस्तऐवज म्हणून समोर येत आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी, ऊस उत्पादक, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढणारे नेतृत्व म्हणून पंजाबराव पाटील यांनी राज्यभर वेगळी ओळख निर्माण केली आहे. अन्यायाविरोधातील त्यांची आक्रमक भूमिका, शेतकरी प्रश्नांवरील आंदोलनांची धार, शासनाविरोधातील लढे आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी दिलेला संघर्ष यामुळे ते शेतकरी चळवळीतील एक झुंजार नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आयुष्यातील संघर्षपूर्ण घटनांचा, आंदोलनांच्या प्रवासाचा तसेच सामाजिक आणि राजकीय कार्याचा सविस्तर आढावा या पुस्तकातून मांडण्यात आला आहे.
या बहुचर्चित पुस्तक प्रकाशन सोहळ्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर तसेच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. राज्यातील विविध शेतकरी चळवळींमध्ये सक्रिय असलेले हे सर्व नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे राज्यभरातील शेतकरी कार्यकर्ते आणि नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे.

तसेच कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक गुजर राहणार असून कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

पत्रकार विकास भोसले यांनी पंजाबराव पाटील यांच्या जीवनातील विविध संघर्षमय टप्पे, आंदोलनांची पार्श्वभूमी, ग्रामीण भागातील वास्तव आणि शेतकरी चळवळीतील त्यांच्या नेतृत्वाचा सखोल अभ्यास करून हे पुस्तक साकारले आहे. शेतकरी चळवळीचा इतिहास, सामाजिक परिवर्तनासाठीचा लढा आणि लोकशाही मार्गाने उभे राहिलेले जनआंदोलन यांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

कराडमध्ये होणारा हा प्रकाशन सोहळा केवळ पुस्तक प्रकाशनापुरता मर्यादित न राहता शेतकरी चळवळीच्या इतिहासाला उजाळा देणारा आणि संघर्षमय नेतृत्वाला मानवंदना अर्पण करणारा सोहळा ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अभ्यासक, युवक आणि नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक सदस्य बी. जी. काका पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष गणेशदादा शेवाळे तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास जाधव यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार