येवती परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कराड येथे उत्साहात गौरव विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी; पुढील वाटचालीसाठी अधिक मेहनत घ्या – वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप
कराड : विद्या मोरे
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने येवती परिसरातील दहावी परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ कराड येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून यशाचे नवे शिखर गाठावे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप होते. प्रमुख पाहुणे म्हणून कराड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी, मंडल अधिकारी शितल सुतार, तलाठी करुणा मॅडम, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षा विद्याताई मोरे तसेच क्रीडा शिक्षक पांडुरंग पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि शुभेच्छापत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करत असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले. “दहावीतील यश ही केवळ सुरुवात आहे. पुढील शिक्षणातही सातत्य, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास कायम ठेवला तर विद्यार्थी निश्चितपणे मोठे यश मिळवू शकतात,” असे ते म्हणाले.
तसेच विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालकांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सातत्यपूर्ण अभ्यास, ध्येय निश्चिती आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सर्वात मोठे साधन असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही न्यूनगंडाशिवाय मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या सत्कार समारंभासाठी ग्रामीण शिक्षण संस्थेचे येवती विद्यालय (येवती), न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (उंडाळे), सद्गुरु बाबा महाराज हायस्कूल (सवादे) तसेच कोटा अकॅडमी (कराड) येथील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा उत्साह कार्यक्रमात विशेष पाहायला मिळाला.
विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामुळे पालक आणि शिक्षकांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्या मुलांचा सन्मान होत असल्याचे पाहून अनेक पालक भावूक झाले. विद्यार्थ्यांनीही भविष्यात अधिक मेहनत घेऊन उच्च शिक्षणात मोठे यश संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रेरणादायी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. कार्यक्रमास उपस्थित पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून स्वागत करत आयोजकांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment