७८ वर्षांची जनसेवा अविरत; कराड आगारात लालपरीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
कराड : विद्या मोरे : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनसेवेचा ध्यास घेऊन धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या ‘लालपरी’चा ७८ वा वर्धापन दिन कराड आगारात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त बसस्थानक परिसर आकर्षक सजावटीने नटला होता. कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाशांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन करून लालपरीच्या गौरवशाली प्रवासाला सलाम करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त कराड बसस्थानक परिसरात आकर्षक रंगोली काढण्यात आली होती. तसेच केळीचे खांब, हार-तुरे आणि विविध सजावटीद्वारे संपूर्ण बसस्थानक सुशोभित करण्यात आले होते. यामुळे बसस्थानक परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. प्रवाशांचे लक्ष वेधून घेणारी सजावट आणि रंगोली हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
या प्रसंगी बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पेढे आणि साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. लालपरीच्या ७८ वर्षांच्या अखंड सेवेला अभिवादन करत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी वरिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती शर्मिष्ठा पोळ, कनिष्ठ आगार व्यवस्थापक विक्रम हांडे, स्थानक प्रमुख किशोर जाधव, कार्यशाळा प्रमुख सुरेंद्र जगदाळे, वाहतूक निरीक्षक वैभव साळुंखे, वरिष्ठ वाहतूक निरीक्षक अनिल लटके, आगार लेखाधिकारी भांडिर्गे, वाहतूक नियंत्रक, लेखनिक तसेच चालक, वाहक आणि कार्यशाळेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत लाखो प्रवाशांची विश्वासू साथीदार बनलेल्या लालपरीने गेल्या ७८ वर्षांत जनसेवेची परंपरा जपली आहे. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वसामान्यांच्या प्रवासाचा अविभाज्य भाग बनलेल्या एसटीच्या या गौरवशाली प्रवासाला कराड आगारात अभिमानाने सलाम करण्यात आला.
Comments
Post a Comment