“कृष्णात परिवर्तन अटळ”; पवारांचा निरोप घेऊन शशिकांत शिंदे मैदानात ;; अर्चनाताई मोहितेंच्या चेअरमन पदासाठी रणशिंग“अर्चनाताईंना चेअरमन करायचं, हा पवार साहेबांचा निरोप”
विंग, ता. कराड : विद्या मोरे ; यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनलच्या प्रचाराचा विंग येथे उत्साहात शुभारंभ झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी, “अर्चनाताई मोहिते यांना चेअरमन करायचे आहे, हा पवारसाहेबांचा निरोप घेऊन आलो आहे,” असे सांगत सभासदांना संस्थापक पॅनलच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
प्रचार शुभारंभ सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन तथा संस्थापक पॅनलचे नेते अविनाशदादा मोहिते, संस्थापक पॅनलच्या नेत्या व उमेदवार अर्चनाताई मोहिते, ज्येष्ठ नेते अजितराव पाटील-चिखलीकर यांच्यासह सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“परिवर्तनासाठी सभासदांनी एकजूट व्हावे”
शशिकांत शिंदे म्हणाले, “जेव्हा सर्व नेते विरोधात एकत्र येतात, तेव्हा समजायचे आपला नेता त्यांना पुरून उरतोय. अविनाशदादा मोहिते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या अर्चनाताई मोहिते यांना सभासदांनी साथ द्यावी. संस्थापकांनी उभा केलेला कारखाना पुन्हा सक्षम करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. प्रलोभनांना बळी न पडता सभासदांनी परिवर्तन घडवावे. सातारा-सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानी सभासद निश्चितच इतिहास घडवतील.”
सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अविनाश मोहितेंची टीका
यावेळी अविनाश मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. “गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा एक रुपयाही जादा दर मिळालेला नाही. संस्थापक पॅनलच्या काळात आदर्श ठरलेल्या इरिगेशन योजना डबघाईला आणल्या. आम्ही शेतकऱ्यांना जादा दर, पाणी फेऱ्यांमध्ये वाढ, हजारो मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि कामगारांना २५ टक्के बोनस दिला. मात्र कारखाना आणि संस्था लुटण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले,” असा आरोप त्यांनी केला.
कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहिला पाहिजे
कारखाना सहकारी तत्वावर सभासदांच्या मालकीचाच राहिला पाहिजे, यासाठी ही निवडणूक असल्याचे सांगत अविनाश मोहिते यांनी सभासदांना संस्थापक पॅनलच्या बाजूने कौल देण्याचे आवाहन केले.
अर्चनाताई मोहिते म्हणाल्या, “आज अनेक शक्ती आमच्या विरोधात असल्या तरी पदापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे. सभासदांना १२० किलो मोफत साखर, पाणीपट्टीत सवलत आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मी शेतकऱ्याची लेक आहे. दिलेला शब्द पाळणाऱ्या घरची सून आणि तुमची बहीण म्हणून दिलेली आश्वासने शंभर टक्के पूर्ण करेन.”
सभासदांच्या निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह
नामदेव पाटील यांनी सभासदांच्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले, तर बंडानाना जगताप यांनी कारखान्याच्या साखर व उपउत्पादनांमधील उत्पन्नाच्या आधारे ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये दर देणे शक्य असल्याचा दावा केला.
पदाधिकाऱ्यांची मनोगते, कार्यकर्त्यांचा उत्साह
यावेळी माजी संचालक सुभाष पाटील, महेश पाटील, उदय शिंदे, अविनाश पाटील-वाठारकर, रामभाऊ होगले, रवी काकडे, ॲड. प्रमोद पाटील, विजय पाटील, आप्पा थोरात, गजानन पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली.
दरम्यान, घारेवाडी-पोतले ग्रामस्थांच्या वतीने बंधारा मंजूर करून पूर्ण केल्याबद्दल तत्कालीन जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सभेला परिसरातील शेतकरी सभासद, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
‘पळता भुई थोडी होईल’
प्रचार वैयक्तिक पातळीवर नेऊ नये, असा सल्ला देताना अविनाश मोहिते यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “आम्ही त्यांच्या खाजगी बाबींमध्ये बोलायला लागलो तर त्यांना पळता भुई थोडी होईल,” असा इशारा त्यांनी व्यासपीठावरून दिला.
धावरवाडीचा कारखाना कुणाच्या पैशातून?
ज्येष्ठ नेते अजितराव पाटील-चिखलीकर यांनी धावरवाडी साखर कारखाना, शिरवळ प्रकल्पासाठी आलेला निधी आणि त्यामागील आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित करत विरोधकांवर टीका केली. अर्चनाताई मोहिते या कृष्णा कारखान्याच्या पुढील चेअरमन होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment