पालिका इमारतीचा ढासळता कारभार! खिडकी डोक्यावर पडून संजय चन्ने जखमी कराड नगरपालिकेच्या इमारतीतील खिडकीचा भाग अचानक कोसळला; श्री हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू

 

कराड :  विद्या मोरे : कराड नगरपालिकेच्या आवारातील इमारतीच्या जीर्ण अवस्थेचा फटका सामाजिक कार्यकर्ते संजय चन्ने यांना बसला. पालिका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीचा वरचा भाग अचानक कोसळून त्यांच्या डोक्यावर पडल्याने ते जखमी झाले. ही घटना आज दुपारी साडेचारच्या सुमारास घडली असून त्यांच्यावर श्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

संजय चन्ने हे आज दुपारी कामानिमित्त कराड पालिकेच्या आवारात असलेल्या तलाठी कार्यालयात आले होते. आपले काम पूर्ण करून ते कार्यालयाबाहेर पडत असताना दुसऱ्या मजल्यावरील खिडकीचा वरचा भाग अचानक तुटून खाली कोसळला. हा भाग थेट त्यांच्या डोक्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

घटना घडताच परिसरात एकच धावपळ उडाली. त्यावेळी पालिकेत उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, सौरभ पाटील (तात्या), प्रसाद माने, नगरसेवक नरेंद्र लिबे, सिद्धार्थ संकपाळ, आशिष रैनाक, अमोल पवार, युवराज सावंत आणि अमित होमकर यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी चन्ने यांना तत्काळ श्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

सध्या श्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, पालिका इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न या घटनेनिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

खिडकीचा जड भाग नागरिकांच्या गर्दीच्या वेळी कोसळला असता मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने जुन्या व जीर्ण इमारतींची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार