ऐतिहासिक विक्रमाला भक्तीपूर्ण सलाम; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ कराडमध्ये भव्य महाआरती
( श्री स्वामी समर्थ केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित महाआरती करताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले.)
कराड विद्या मोरे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल कराड शहरात भाजपाच्या वतीने भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. कार्वे नाका येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते ही महाआरती उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
• विक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकास, सुरक्षा आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांच्या नेतृत्वातील विविध निर्णयांमुळे भारताला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी महाआरतीद्वारे कृतज्ञता व्यक्त केली.
• देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण पावले
यावेळी बोलताना आ. डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून गेल्या १२ वर्षांत देशाच्या प्रगतीसाठी, स्थैर्यासाठी आणि उन्नतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. विविध विकासाभिमुख योजनांमुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आले आहेत.
• कर्तव्यपथ आणि आत्मनिर्भर भारताची दिशा
दिल्लीतील राजपथचे ‘कर्तव्यपथ’मध्ये रूपांतर करून राष्ट्रीय कर्तव्यभावनेचा संदेश देण्याचे काम मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले. तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेच्या माध्यमातून देशाला स्वावलंबनाची नवी दिशा देण्यात आली असून उद्योग, पायाभूत सुविधा आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
• संरक्षण दलाला दिले बळ
देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी संरक्षण दलाला आवश्यक ते बळ आणि आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे भारताची संरक्षण क्षमता अधिक मजबूत झाली असून जगभरात भारताची प्रतिमा अधिक उंचावली आहे, असेही आ. भोसले यांनी सांगितले.
• मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास माजी आमदार आनंदराव पाटील, कराडचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, नगरसेवक सुहास जगताप, शिवाजी पवार, आशुतोष डुबल, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, भाजपाच्या शहराध्यक्षा सुषमा लोखंडे, स्मिता हुलवान, गिरीश शहा, रमेश मोहिते, उमेश शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment