मोफत साखर कुठे गेली? हक्कासाठी संतप्त शेतकरी सह्याद्रीवर धडकले; व्यवस्थापन समोर प्रश्नांचा डोंगर

 
कराड, ता. विद्या मोरे — सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सुपने-तांबवे विभागातील ऊस उत्पादक सभासदांनी विविध प्रलंबित प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घेत कारखान्यावर धडक दिली. हक्काची सभासद साखर, मोफत साखरेचे आश्वासन, ऊस गाळपाचे नियोजन आणि सभासदांशी होत असल्याचा आरोप असलेली अन्यायकारक वागणूक या मुद्द्यांवर शेतकऱ्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारला.

शेतकऱ्यांनी आरोप केला की, कारखान्याकडून मोफत साखर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ते प्रत्यक्षात पूर्ण करण्यात आले नाही. उलट सभासद साखरेचा दर वाढवून १५ रुपये करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अनेक वर्षे कारखान्याशी निष्ठा ठेवणाऱ्या सभासदांच्या हक्कांवर गदा येत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

याशिवाय, ऊस उत्पादक सभासदांना मिळणारी साखर बंद करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी आपला ऊस अन्यत्र गाळपासाठी पाठविल्यानंतर त्यांच्याकडून माफीनामा मागितल्याबाबतही संताप व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांनी हा प्रकार अन्यायकारक असल्याचे सांगत व्यवस्थापनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.

या सर्व प्रश्नांवर शेतकरी प्रतिनिधींनी सह्याद्री कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर लेखी निवेदन सादर केले. निवेदनामध्ये सभासद साखर, मोफत साखर, ऊस गाळप, मयत सभासदांच्या वारसांचे शेअर्स हस्तांतरण तसेच इतर प्रलंबित प्रश्नांचा समावेश होता.

शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्यांची दखल घेत कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे यांनी येत्या गळीत हंगामात सुपने-तांबवे विभागातील सुमारे ३० हजार टन ऊस गाळपाची जबाबदारी स्वतः घेण्याचे आश्वासन दिले. तसेच सभासद साखर, वारसांचे शेअर्स हस्तांतरण आणि इतर मागण्या संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाने सभासदांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला. या आंदोलनात सुपने-तांबवे विभागातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या एकजुटीमुळे कारखाना परिसरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार