सहकार टिकविण्यासाठी मतभेद विसरून एकत्र या सहकार पॅनलला रयत संघटनेचा भक्कम पाठिंबा : ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर कृष्णा कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्वेत रयत संघटनेचा मेळावा उत्साहात

 कार्वे येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचारार्थ आयोजित रयत संघटनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर.

कराड विद्या मोरे : सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या विजयासाठी रयत संघटना पूर्ण ताकदीने काम करेल, अशी ग्वाही रयत संघटनेचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी दिली.

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्वे (ता. कराड) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचारार्थ आयोजित रयत संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सहकार पॅनलचे उमेदवार बी. एन. थोरात, प्रा. धनाजी काटकर, डॉ. सुधीर जगताप, सुजीत थोरात, रंगराव थोरात, प्रतापराव कणसे, प्रदीप पाटील, शिवाजीराव जाधव, अधिकराव गरुड, के. टी. पाटील, मोहनराव थोरात, माणिकराव पाटील, पैलवान आनंदराव मोहिते, राजू मुल्ला यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
रयत’ आणि ‘कृष्णा’चे ३५ वर्षांचे सहकार्य

ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर म्हणाले, “रयत आणि कृष्णा या दोन संस्थांनी गेली सुमारे ३५ वर्षे एकत्रितपणे काम केले आहे. सहकार क्षेत्र अधिक सक्षम व्हावे, यासाठी काका आणि आप्पांनी घालून दिलेल्या मार्गावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. प्रत्येकवेळी विरोधासाठी विरोध करणे समाजहिताचे नसते. सहकारी संस्था टिकल्या तरच शेतकऱ्यांची प्रतिष्ठा आणि आर्थिक बळकटी कायम राहणार आहे.”

ते पुढे म्हणाले, “आज सहकार क्षेत्राला कार्पोरेट क्षेत्राशी स्पर्धा करावी लागत आहे. अशा परिस्थितीत सहकारी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे. रयत संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करून सहकार पॅनलच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी.”

सहकारातील यशस्वी संस्था टिकविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे

डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या भाषणात सहकार क्षेत्रातील एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “आप्पा आणि काकांनी सहकाराचा विचार अंगीकारत एकत्रितपणे काम केले. त्यातून या भागात अनेक पथदर्शी प्रकल्प उभे राहिले आणि ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळाली. आज तीच परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आमच्यावर आहे.”

“चांगल्या पद्धतीने चालणाऱ्या सहकारी संस्था टिकवायच्या असतील तर संघर्ष थांबवून सर्वांनी एकत्र यायला हवे. भविष्यात रयत संघटनेलाही आमचे भक्कम सहकार्य राहील,” असे आश्वासनही त्यांनी दिले.

विरोधकांवर डॉ. भोसले यांची टीका

डॉ. भोसले म्हणाले, “आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि दिलेला शब्द पाळतो. मात्र विरोधकांनी सहकार क्षेत्रात घोटाळे करून कारखान्याची प्रतिमा मलिन केली. ज्यांच्यामुळे संस्थेची बदनामी झाली, अशीच मंडळी आज पुन्हा मतांसाठी सभासदांपुढे जात आहेत. सभासदांनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडता विकास आणि पारदर्शकतेच्या बाजूने उभे राहावे.”

१५ हजारांहून अधिक मताधिक्याचा दावा

प्रा. धनाजी काटकर यांनी सहकार पॅनल १५ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी वैयक्तिक मतभेद विसरून एकदिलाने काम केल्यास विजय अधिक भक्कम होईल, असे त्यांनी सांगितले.

कृष्णा-कोयना एकत्र येणे विकासासाठी महत्त्वाचे

डॉ. सुधीर जगताप म्हणाले, “कृष्णा आणि कोयना हे दोन प्रभावी ब्रँड एकत्र आले आहेत, ही या भागासाठी सकारात्मक बाब आहे. संकटाच्या काळात डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखाली कारखाना सुरक्षित राहिला. त्यांनी कामगारांना न्याय देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करणे आवश्यक आहे.”

यावेळी सुजीत थोरात, रंगराव थोरात आणि प्रतापराव कणसे यांनीही मनोगत व्यक्त केले. अशोकराव थोरात यांनी आभार मानले. मेळाव्यास रयत संघटनेच्या विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार