घोटाळेच विरोधकांची ओळख ; विकास आणि विश्वास हेच आमचे बळ : डॉ. सुरेश भोसले 'वाठारच्या जाहीर सभेत सहकार पॅनलचा विकासाचा लेखाजोखा ; विरोधकांच्या आश्वासनांवर जोरदार टीका
कराड, ता. विद्या मोरे : स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) आणि सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या विचारांचा वारसा जपत य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने गेल्या अकरा वर्षांत विकासाची नवी उंची गाठली आहे. कारखान्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करताना शेतकरी, सभासद आणि कामगारांचा विश्वास जपला. मात्र विरोधकांनी त्यांच्या सत्ताकाळात घोटाळ्यांपलीकडे कोणते ठोस काम केले, याचे उत्तर त्यांनी सभासदांना द्यावे, असा घणाघाती सवाल कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केला.
वाठार (ता. कराड) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दत्तात्रय देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आर्थिक अडचणीतून पुरस्कारप्राप्त कारखान्याकडे
डॉ. भोसले म्हणाले, २०१५ मध्ये कारखान्याची धुरा हाती घेतली तेव्हा आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. व्यापाऱ्यांची देणी फेडण्यासाठीही निधी उपलब्ध नव्हता. मात्र सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर कारखाना केवळ सावरलाच नाही तर राज्यातील आदर्श कारखान्यांपैकी एक बनला. पारदर्शक आर्थिक व्यवस्थापनामुळे कारखान्याला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
पुढील पाच वर्षांसाठी विकासाचा संकल्प
सिंचन योजनांचे आधुनिकीकरण, जमीन क्षारपडमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम, कार्यक्षेत्रातील सर्व पाणंद रस्त्यांची पूर्तता आणि केंद्र-राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्याचा संकल्प सहकार पॅनलने केला आहे. ऊसदराच्या बाबतीतही कृष्णा कारखाना राज्यात अव्वल राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस का?
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना सांगितले की, आज १२० किलो मोफत साखरेची घोषणा करणाऱ्यांनी सत्ता असताना सभासदांसाठी काय केले? निवडणूक आली म्हणून आश्वासनांचा पाऊस पाडण्यापेक्षा कामाचा हिशेब द्यावा. गेल्या अकरा वर्षांत कारखान्याला मिळालेले १४ पुरस्कार हेच संचालक मंडळाच्या कार्यक्षमतेचे प्रमाणपत्र आहे.
भाऊ-आप्पांच्या स्वप्नांना नवी दिशा
राजेश पाटील-वाठारकर यांनी भाऊ आणि आप्पांनी उभारलेल्या सहकार चळवळीला डॉ. सुरेश भोसले यांनी आधुनिकतेची जोड दिल्याचे सांगितले. त्यामुळे आज कृष्णा कारखान्याचे नाव राज्यातील अग्रगण्य साखर कारखान्यांमध्ये घेतले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सभेत सहकार पॅनलचे उमेदवार अरविंद पाटील, बाळासाहेब जगताप, सुनीता शेवाळे, सुजाता जाधव यांच्यासह विविध गावांतील मान्यवर आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने सहकार पॅनलच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे दिसून आले.
"काम, पारदर्शकता आणि विकासाच्या बळावरच आम्ही सभासदांसमोर जात आहोत; विरोधकांकडे मात्र आश्वासनांपलीकडे काहीच नाही." — डॉ. सुरेश भोसले.
Comments
Post a Comment