सत्ताधाऱ्यां विरोधात सभासदांची एकजूट; कृष्णात सत्तांतराची चाहूल, अर्चनाताई मोहितेंच्या नेतृत्वाला शशिकांत शिंदेंची जोरदार साथ; सभासदांचा वाढता विश्वास

 कराड : विद्या मोरे 

बोरगाव, ता. — कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तनाची लाट अधिक तीव्र होत असून, सभासदांचा वाढता पाठिंबा आणि विविध राजकीय पक्षांची एकजूट यामुळे कृष्णात सत्तांतराची चाहूल लागली आहे. सभासदांनी अर्चनाताई मोहिते यांना चेअरमनपदी निवडून देत सहकार क्षेत्रात नवा इतिहास घडवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले.

बोरगाव येथे कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते सहकार पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी पॅनेलच्या नेत्या उमेदवार अर्चनाताई मोहिते, माजी चेअरमन अविनाश मोहिते, माजी व्हाइस चेअरमन सुरेश पाटील, महेश पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, बंडानाना जगताप, गजानन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सभासदांचा विश्वास हेच परिवर्तनाचे बळ

शशिकांत शिंदे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेल्या या लढतीत सभासदांचा विश्वास हेच संस्थापक पॅनेलचे सर्वात मोठे बळ आहे. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत निर्माण झालेली परिवर्तनाची लाट आता थांबणारी नाही. विविध पक्ष आणि गट संस्थापक पॅनेलच्या मागे उभे राहत असल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शरद पवार जसे संघर्षातून उभे राहिले, त्याचप्रमाणे अविनाश मोहितेही सभासदांच्या बळावर ही लढाई यशस्वी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला नेतृत्वाला संधी देण्याची हीच योग्य वेळ

अर्चनाताई मोहिते या केवळ उमेदवार नसून सहकार क्षेत्रात महिला नेतृत्वाचा नवा चेहरा आहेत. महिला सक्षमीकरणाची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी महिला उमेदवाराला बिनविरोध संधी देण्याचे धैर्य दाखवायला हवे होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आता सभासदांनीच मतदानातून महिला नेतृत्वाच्या बाजूने कौल देऊन परिवर्तन घडवावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

स्थानिक युवकांना रोजगार मिळायलाच हवा

कारखान्यातील रोजगाराच्या संधींमध्ये स्थानिक शेतकरी कुटुंबातील युवकांना प्राधान्य मिळाले पाहिजे. बाहेरील कामगारांवर अवलंबून राहण्याऐवजी स्थानिक तरुणांना रोजगार देण्याची भूमिका आपण घेणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. कृष्णा कारखान्याचा विकास हा स्थानिक शेतकरी आणि युवकांच्या प्रगतीशी जोडलेला असला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

"आम्ही आश्वासने नाही, वचनपूर्ती करणारे आहोत"

अर्चनाताई मोहिते यांनी सभासदांना भावनिक साद घालत आपण एका सामान्य शेतकरी कुटुंबातील स्त्री, पत्नी, मुलगी आणि सून म्हणून त्यांच्या समोर उभे असल्याचे सांगितले. कारखाना मजबूत राहिला तरच सहकाराची परंपरा टिकून राहणार आहे. त्यामुळे सभासदांनी विश्वास दाखवून एकदा संधी द्यावी.

“आम्ही केवळ आश्वासने देणारे नाही, तर वचनपूर्ती करणारे आहोत. संसार सांभाळणारी स्त्री कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. सभासदांचा विश्वास सार्थ ठरेल असा न्याय्य आणि पारदर्शक कारभार करून दाखवू,” असे त्या म्हणाल्या.

संस्थापक पॅनेलच्या आश्वासनांचा पुनरुच्चार

माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी संस्थापक पॅनेलच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीची तुलना सत्ताधाऱ्यांच्या अकरा वर्षांच्या कारभाराशी करून मतदान करण्याचे आवाहन केले. सभासदांना दरवर्षी १२० किलो मोफत साखर, एकरी ७५०० रुपयांची पाणीपट्टी, ऊस बियाण्याची उपलब्धता, मयत सभासदांच्या शेअर्सचे तीन महिन्यांत हस्तांतरण, बैठी पाणीपट्टी पूर्णपणे माफ करणे आणि एफआरपीपेक्षा जास्त ऊसदर देण्याचे आश्वासन त्यांनी पुन्हा दिले.

९७७ कोटींच्या कर्जावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

बंडानाना जगताप यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कृष्णा कारखान्यापेक्षा नंतर स्थापन झालेल्या राजारामबापू समूहाने विविध संस्था उभारल्या, मात्र कृष्णा कारखान्यावर तब्बल ९७७ कोटी रुपयांचे कर्ज कसे झाले, असा सवाल त्यांनी केला. जयवंत शुगर कारखान्यावर एक रुपयाचेही कर्ज नसल्याचा दाखला देत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विकासाच्या दाव्यांवर टीका केली.

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढत

माजी पंचायत समिती सदस्य स्वाती मदने यांनी ही निवडणूक धनशक्ती आणि जनशक्ती यांच्यातील लढत असल्याचे सांगितले. बालाजी जगताप यांनी महिला चेअरमन निवडून देण्याची ऐतिहासिक संधी सभासदांसमोर असल्याचे नमूद केले. प्रमोद पाटील यांनी सभासदांमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी वाढता असंतोष असल्याचा दावा केला, तर सचिन कदम यांनी संस्थापक पॅनेलच्या जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

महेश पवारांचा जाहीर पाठिंबा

अपक्ष उमेदवार महेश पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत संस्थापक पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला. तसेच लवंडमाची येथील अनेक सभासदांनी संस्थापक पॅनेलमध्ये प्रवेश करत परिवर्तनाच्या लढ्याला बळ दिले.

जयंत पाटलांच्या भूमिकेवर सूचक भाष्य

उदय शिंदे यांनी कृष्णा कारखान्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची साखर तयार होत नसताना त्याच दर्जाची साखर सभासदांना देण्याचे आश्वासन कसे पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित केला. माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिलेला नसला तरी त्यांच्या मनातील भूमिका सभासदांना समजली असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

वाळवा तालुक्यातून परिवर्तनाची क्रांती होणार

उमेदवार महेश पवार यांनी वाळवा हा क्रांतिकारकांचा तालुका असल्याचे सांगत मतदानातून सभासद परिवर्तन घडवतील आणि सत्ताधाऱ्यांना धडा शिकवतील, असा विश्वास व्यक्त केला. आगामी राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू वाळवा तालुका ठरेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

सभेस परिसरातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार जयसिंगराव शिंदे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार