हृदय उपचारात क्रांती : चिरफाडविना हृदयाला नवे जीवन, कृष्णा हॉस्पिटल मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिला दुहेरी कक्ष लीडलेस पेसमेकर यशस्वी १७ लाखांची अत्याधुनिक शस्त्रक्रिया ईसीएचएस योजनेतून पूर्णपणे मोफत; प्रगत हृदयरोग उपचार क्षेत्रात नवा मैलाचा दगड
कराड, दि. २२ : विद्या मोरे हृदयविकार उपचार क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिली अत्याधुनिक दुहेरी कक्ष (ड्युअल चेंबर) लीडलेस पेसमेकर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. कोणतीही छातीवरील चिरफाड न करता करण्यात आलेली ही गुंतागुंतीची प्रक्रिया हृदयरोग उपचारातील आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा टप्पा मानली जात आहे. सुमारे १७ लाख रुपये खर्चाची ही शस्त्रक्रिया माजी सैनिक अंशदान आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत रुग्णाला पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली.
वारंवार संसर्गामुळे निर्माण झाले गंभीर आव्हान
कराड येथील ७१ वर्षीय माजी सैनिक रुग्णाला संपूर्ण हृदय अवरोध (Complete Heart Block) असल्याने काही वर्षांपूर्वी कायमस्वरूपी पेसमेकर बसविण्यात आला होता. मात्र कालांतराने पेसमेकर बसविलेल्या ठिकाणी वारंवार संसर्ग होऊ लागला. दोन वेळा शस्त्रक्रिया करूनही संसर्गाची समस्या कायम राहिल्याने पारंपरिक पेसमेकर बसविणे धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती.
छातीवर चिरफाड न करता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयरोग तज्ज्ञांनी तपासणीनंतर लीडलेस ड्युअल चेंबर पेसमेकर प्रणाली हा अत्याधुनिक पर्याय निवडला. या तंत्रज्ञानात छातीवर कोणतीही शस्त्रक्रिया न करता मांडीतील रक्तवाहिनीतून कॅथेटरद्वारे सूक्ष्म उपकरणे थेट हृदयात बसवली जातात.
या प्रक्रियेत हृदयाच्या वरच्या व खालच्या कक्षात स्वतंत्र दोन लहान उपकरणे बसविण्यात आली. ही उपकरणे वायरलेस पद्धतीने एकमेकांशी समन्वय साधून हृदयाची नैसर्गिक गती नियंत्रित करतात. त्यामुळे पारंपरिक पेसमेकरमधील तारा, छातीवरील चिरफाड आणि संसर्गाचा धोका टाळणे शक्य झाले.
रुग्णाला जलद पुनर्वसनाचा लाभ
या अत्याधुनिक उपचारानंतर रुग्णाच्या संसर्गाचा धोका लक्षणीयरीत्या कमी झाला असून कमी वेदनांमध्ये जलद पुनर्वसन शक्य झाले आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली यशस्वी शस्त्रक्रिया
ही शस्त्रक्रिया कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अभिजीत शेळके यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली.
यामध्ये डॉ. सोमनाथ, डॉ. प्रशांत पवार, डॉ. रमेश कवडे तसेच कॅथलॅबमधील तांत्रिक कर्मचारी व परिचारिका यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
ईसीएचएस योजनेअंतर्गत प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी उपकुलसचिव एस. ए. माशाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे सुमारे १७ लाख रुपयांची ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया रुग्णाला पूर्णपणे मोफत उपलब्ध झाली.
हृदयरोग उपचार क्षेत्रातील महत्त्वाचे तांत्रिक पाऊल
डॉ. अभिजीत शेळके यांनी सांगितले की, “लीडलेस पेसमेकर तंत्रज्ञान हे हृदयरोग उपचार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे प्रगत पाऊल आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये, रक्तवाहिन्यांतील अडथळे असलेल्या रुग्णांमध्ये किंवा वारंवार पेसमेकर बदलण्याची गरज असलेल्या प्रकरणांमध्ये ही पद्धत अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरते.”
कृष्णा हॉस्पिटल : प्रगत इलेक्ट्रोफिजिओलॉजीचे प्रमुख केंद्र
गेल्या ११ वर्षांपासून कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र इलेक्ट्रोफिजिओलॉजी विभाग कार्यरत असून हृदयाच्या ठोक्यांशी संबंधित विविध आजारांवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत.
सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच उत्तर कर्नाटक आणि गोवा येथील रुग्णही या विभागातील सेवांचा लाभ घेत आहेत. येथे इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडी, रेडिओफ्रिक्वेन्सी एब्लेशन, आयसीडी प्रत्यारोपण, सीआरटी उपकरणे आणि अत्याधुनिक पेसमेकर प्रणाली यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत.
सुसज्ज कॅथलॅब, अनुभवी तज्ज्ञांचे पथक आणि आधुनिक पायाभूत सुविधा यामुळे कृष्णा हॉस्पिटलने प्रगत हृदयरोग उपचार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
Comments
Post a Comment