ज्ञानाच्या नव्या प्रवासाची उत्साहात सुरुवात; श्री जोतिर्लिंग विद्यालयात नवागतांचे जल्लोषात स्वागत पुस्तक संच, पेन व खाऊचे वाटप; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणार – सुनीलराव पाटील

फोटो : नवागत विद्यार्थ्यांना पुस्तक संच व खाऊचे वाटप करताना संस्थेचे अध्यक्ष सुनीलराव पाटील, कोमलताई यादव, संचालक मंडळ, मुख्याध्यापक दिलीप माने व स्टाफ.

कराड: विद्या मोरे ;कवठे येथील श्री जोतिर्लिंग विद्यालयात इयत्ता आठवीच्या नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेल्या या स्वागत सोहळ्यामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी शाम-शरद शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनीलराव पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब साळुंखे, पंचायत समिती सदस्या कोमलताई यादव, संचालक दिलीपराजे यादव, डी. जी. कळसकर, मनोहर यादव, अर्चना पाटील, शिवाजी यादव, अक्षय पाटील, अधिकराव यादव, मुख्याध्यापक दिलीप माने, ज्येष्ठ शिक्षक राजेंद्रप्रसाद चव्हाण, शिक्षक विवेक अवघडे, सौ. स्वाती माने, क्लार्क सुरेश सूर्यवंशी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्ष सुनीलराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, श्री जोतिर्लिंग विद्यालय हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विविध अभ्यासपूर्ण व वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपले भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

पंचायत समिती सदस्या कोमलताई यादव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी जिद्द, मेहनत आणि सातत्य आवश्यक असल्याचे सांगितले. नवीन शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचे आणि यशाचे ठरो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

संचालक अक्षय पाटील यांनी विद्यालयात नियमित अभ्यासासोबत आनंददायी शनिवार, कॉम्प्युटर शिक्षण, स्पोकन इंग्लिश तसेच विविध कौशल्यविकास उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पुस्तक संच, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक दिलीप माने यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ विज्ञान शिक्षक राजेंद्रप्रसाद चव्हाण यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन यादव व दीपक दाभाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विद्यालयाने केलेले आगळेवेगळे स्वागत यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार