स्मार्ट मीटरच्या विरोधात कराडात एल्गार; सोमवारी महावितरणविरोधात जनआक्रोश आंदोलन :सक्तीविरोधात संघटनांची आक्रमक भूमिका
कराड विद्या मोरे
स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत राज्यभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये सोमवारी (दि. २२ जून) महावितरणविरोधात जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. वीज ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविणे, पूर्वकल्पना न देता वीज कनेक्शन खंडित करणे आणि ग्राहकांच्या शंकांचे समाधान न करणे या मुद्द्यांवर विविध सामाजिक, शेतकरी व राजकीय संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिवतीर्थ चौकात आंदोलनाची हाक
शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर सकाळी ११ वाजता हे आंदोलन होणार असून कराड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी केले आहे. वीज ग्राहकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महावितरणच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
महावितरणकडून स्मार्ट मीटरमुळे वीज वापराचे अचूक मोजमाप, बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणि तांत्रिक व्यवस्थापनात सुधारणा होईल, असा दावा केला जात आहे. मात्र या दाव्यांबाबत सर्वसामान्य ग्राहकांमध्ये अजूनही अनेक प्रश्न उपस्थित होत असून स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
ग्राहकांच्या तक्रारींमध्ये वाढ
अनेक भागांमध्ये ग्राहकांची पूर्ण संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याशिवाय मीटर बसविल्यानंतर अचानक वीजपुरवठा खंडित होणे, तक्रारींवर तत्काळ कार्यवाही न होणे आणि ग्राहकांशी पुरेसा संवाद न साधणे यामुळे असंतोष वाढत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
पूर्वसूचनेशिवाय कनेक्शन खंडित केल्याचा आरोप
कराड शहरातील काही ग्राहकांचे वीज कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रासासह दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्राहकांना विश्वासात न घेता राबविण्यात येणाऱ्या धोरणांविरोधात लोकांमध्ये नाराजी वाढत असल्याचेही संघटनांनी सांगितले.
प्रीपेड प्रणालीबाबत संभ्रम कायम
स्मार्ट मीटरमुळे भविष्यात प्रीपेड वीज प्रणाली लागू होणार का, ग्राहकांना आगाऊ रक्कम भरून वीज वापरावी लागणार का, तसेच यामुळे वीज बिलांमध्ये वाढ होणार का, अशा अनेक प्रश्नांबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. शासन आणि महावितरणने या विषयावर अधिकृत भूमिका जाहीर करून नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
विविध संघटनांची एकजूट
या जनआक्रोश आंदोलनाला भीमशक्ती सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी युवा काँग्रेस, जान फाउंडेशन तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. वीज ग्राहकांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा उभारण्यासाठी या संघटना पुढे सरसावल्या आहेत. या आंदोलनात कठेसचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, मनसेचे सागर बर्गे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे आनंदराव लादे, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बापू घराळ, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रशांत यादव तसेच जान फाउंडेशनचे जावेद नायकमडी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन
स्मार्ट मीटरची सक्ती थांबविणे, आधी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर हटवून पारंपरिक मीटर पुन्हा बसविणे, ग्राहकांची लेखी संमती घेतल्याशिवाय कोणतीही कारवाई न करणे आणि पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन खंडित करण्याची पद्धत बंद करणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. विविध संघटनांच्या या एकत्रित लढ्याकडे आता वीज ग्राहकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Post a Comment